आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानपूर अपघात म्हणजे यंत्रणेच्या दुर्लक्षाचे बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूरमध्ये रुळावरून डबे घसरून झालेल्या अपघातानंतर प्रचंड जीवितहानी झाली. रेल्वेची ढिसाळ यंत्रणा आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवली. रुळातील अंतर वाढत गेल्याने डबे घसरल्याचे सांगितले जात आहे. अपघाताचे हे एक कारण असले तरी बाकीच्या बाबीही यासाठी जबाबदार आहेत. यात प्रामुख्याने रुळात पडलेली भेग लहानशी वाटली म्हणून त्याकडे वेळीच लक्ष वेधण्यात आले नाही आणि मोठा अनर्थ घडला.

गाडीचे इंजिन आणि त्याच्या पाठीमागील दोन ते तीन डबे या भेगावरून गेल्यानंतर तुटलेल्या रूळावरील भेग वाढत गेली. इंजिनचा भार इतर डब्यांवर पडून ते एकानंतर एक रुळावरून घसरले. घसरणाऱ्या डब्यांमुळे रेल्वे ट्रॅक उखडला गेला आणि मागील डबे उलटत एकामध्ये एक घुसले. लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक दाबल्यानंतर डबे घसरल्याचे म्हटले जात आहे. पण यात तथ्य नाही. कारण सायकलचा ब्रेक दाबल्यानंतर ती उलटावी अशी रचना रेल्वे गाडीच्या इमर्जन्सी ब्रेकची नसते. इमर्जन्सी ब्रेक दाबला तरी गाडी थांबवण्यासाठी ठराविक वेळ लागतोच.

सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे विभागाने दोन डबे जोडण्यासाठी शापो कपलर वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु काही वेळा हेच कपलर अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे दिसते. कारण पूर्वी डबे जोडण्यासाठी स्क्रू कपलरचा वापर व्हायचा, यामुळे रुळावरून डबे घसरताना ते एकमेकापासून लगेचच वेगळे व्हायचे आणि मोठा अपघात टळायचा. पण शापो कपलरमुळे इंजिन डब्यांना दूरवर खेचत नेते. डबे पडले तरी कपलर तुटत नाहीत. परिणामी एकात एक डबे घुसतात. कानपूर येथे याच कपलरमुळे डबे दूरवर खेचले गेले आणि बराच अंतरापर्यंत गेल्यानंतर कपलरही तुटले, यावरून हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज लावता येताे. घाटांमध्ये आणि चढावर गाडी जाते तेव्हा शापो कपलरमुळे गाडी घसरत मागे येण्याची शक्यता नसते. परंतु पूर्वीच्या स्क्रू कपलरमुळे असे अपघात घडायचे.

रेल्वे निरीक्षकांनी ओव्हर हेड वायर तुटणे आणि पाॅवर सप्लाय बंद झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली होती. पण हे कारण न पटणारे आहे. रुळातील भेग वाढत गेल्यानेच हा भीषण अपघात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. रुळातील भेग तपासण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा रेल्वेकडे नाही. शिवाय जी यंत्रणा आहे तिला योग्य पद्धतीने कामाला लावले जात नाही. बहुतांश मार्गांवर वाहतूक प्रचंड वाढली असताना देखभालीकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे असे अपघात भविष्यातही होतच राहणार, असे खेदाने सांगावे लागते.
यशवंत जोगदेव
(लेखक हे वरिष्ठ पत्रकार असून मेट्रो, कोकण रेल्वेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी विविध दैनिकांत रेल्वे अपघातावर अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत.)
बातम्या आणखी आहेत...