आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सर्वच काश्मिरी युवक वाईट नाहीत, गुणवंतांच्या यादीतही त्यांचा समावेश’; मेहबुबा मुफ्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मिरातील सर्वच युवक दगडफेक करणारे नाहीत. अन्यथा राज्यातील युवक राष्ट्रीय परीक्षांमध्ये अव्वल आले नसते, अशी भावना काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली. उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगरमध्ये दरबार मूव्ह सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या. त्यांनी देशातील माध्यमांना काश्मीरच्या लोकांविषयी वाईट गोष्टी दाखवण्याचे थांबवावे, असे आवाहन केले. त्या म्हणाल्या, काश्मीरची वाईटच बाजू दाखवल्यामुळे देशातील अन्य नागरिकांच्या मनात काश्मिरी लोकांप्रती घृणा निर्माण होते. याचा परिणाम राज्याच्या पर्यटनावरही होत आहे. आम्ही खूप वाईट दिवस बघितले आहे. १९४७ पासून आतापर्यंत काश्मीरला अनेकदा संकटांचा सामना करावा लागला असून आम्ही त्यातून सावरलोही आहे. अनेकदा दहशतवाद कमी होतो. तर कधी तो वाढून जातो. आंदोलन करणारे लोक संतापलेले असून त्यांचे मन भरकटलेले आहे. 

उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगरमधून सोमवारपासून काश्मीरच्या राज्य सरकारने सहा महिन्यांसाठी कामकाज सुरू केले. जम्मूच्या सचिवालयातील कर्मचारी, उपमुख्यमंत्री डाॅ. निर्मल सिंह आणि अन्य मंत्री रविवारी सायंकाळीच श्रीनगरला पोहोचताच मागच्या आठवड्यापासून सुरू असलेली “दरबार मूव्ह’ची प्रक्रिया सोमवारी संपन्न झाली. यासाठी सरकारचे सर्व दस्तऐवज आणि कर्मचाऱ्यांना रविवारीच जम्मूहून श्रीनगरला आणण्यात आले. कर्मचाऱ्यांसाठी श्रीनगरच्या सुमारे १०० हॉटेल आणि विश्रामगृहांमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर हे दोन राजधानी असलेले देशातील एकमेव राज्य आहे. उन्हाळा वगळता अन्य सहा महिने जम्मू ही काश्मीरची राजधानी असते. महाराजा रणबीर सिंह यांच्या काळात दरबार सहा महिने जम्मू आणि उर्वरित काळात श्रीनगरमधून चालायचा. यासाठी लाखो रुपये खर्च होत असत.

विद्यार्थ्यांना रोकण्यासाठी गोळीबार...
दक्षिण काश्मीरच्या त्राल आणि श्रीनगरच्या काही भागात आंदोलन करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अडवण्यासाठी गोळीबार करण्यात आला. पुलवामातील हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी हे विद्यार्थी आंदोलन करत होते. यामध्ये जैनाकोट येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचाही समावेश होता. त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात दगडफेकही केली. मात्र, सुरक्षा दल आणि पाेलिसांनी हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

आंदोलनापूर्वी आमदारासह समर्थकांना अटक  
नागरी सचिवालय पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असलेल्या आमदाराला त्यांच्या समर्थकांसह काश्मिरात अटक करण्यात आली आहे. शेख अब्दुल रशीद असे या अपक्ष आमदाराचे नाव आहे. मगरमल बागेजवळून त्यांच्या हजारो समर्थकांनी मोर्चाची तयारी केली होती, परंतु पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामुळे त्यांना आंदोलन करता आले नाही. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यावर टीकाही केली. त्या मुख्यमंत्री या नात्याने काश्मिरात सपशेल अपयशी ठरल्याचा त्यांनी आरोप केला.  
बातम्या आणखी आहेत...