चंदिगड- आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम चंदिगडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २१ जून रोजी सकाळी योगसाधना होणार आहे. व्हीआयपी इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर चंदिगडमध्ये सुमारे हजार पोलिस तैनात ठेवण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यंदाचे दुसरे वर्ष. योगासनाच्या निमित्ताने पोलिस प्रशासनालाही सुरक्षेसाठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी पंजाब हरियाणातून अधिकची कुमक मागवण्यात आली आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांची आढावा घेण्यासाठी लवकरच विशेष संरक्षण गट चंदिगडला भेट देईल. मुख्य कार्यक्रम कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये होणार आहे. त्या परिसराला छावणीचे स्वरूप येणार आहे. कार्यक्रमात ३० हजारांहून अधिक साधक सहभागी होतील. वास्तविक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाख २० हजार नागरिकांनी पूर्वनोंदणी केली आहे.
पंतप्रधान मोदी २० जून रोजी चंदिगडमध्ये दाखल होतील. २१ जूनपूर्वीच चंदिगडमध्ये योगाचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. ते १२ जूनदरम्यान योगोत्सव साजरा करण्यात आला. त्यात श्री श्री रविशंकर यांनी मार्गदर्शन केले. फ्लॅश मॉब झाला. शनिवारी (१८ जून) योगा रन होणार आहे.
योग दिनाची तयारी करताना साधक.
मोदींची दुसरी भेट
पंतप्रधान मोदी यांची ही दुसरी चंदिगड भेट ठरणार आहे. याच वर्षी २४ जानेवारी रोजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा आेलांद यांचा स्वागत समारंभही कॅपिटल कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मोदींचे आगमन झाले होते.
टेक्नोसॅव्ही इव्हेंट
योगदिनाच्या कार्यक्रमाला टेक्नोसॅव्ही इव्हेंटचे रूप देण्याचीही तयारी आहे. त्यासाठी सहभागी प्रत्येकाला रेडिआे फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्ड दिले जाणार आहेत. त्यात आधार क्रमांक, साधकाचे छायाचित्र, वय इत्यादी तपशील असेल. त्या शिवाय कार्यक्रम स्थळी सेल्फी झोनही असेल.
पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राजधानी असलेल्या चंदिगडमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने हरियाणातही लगबग सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी राज्यस्तरीय योग प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. हरियाणाचे ब्रँड अॅम्बेेसेडर रामदेव बाबा यांनी पंचकुलातील शिबिरात मार्गदर्शन केले. त्यात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्री, आमदार अधिकारी सहभागी झाले होते.