आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचे ISIS चे प्रयत्न, २००-२२५ अतिरेकी दडलेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झांगर (नौशेरा) - इराक, सिरियात दहशतवादाचा अत्यंत अमानवी आणि क्रूर चेहरा दाखवणाऱ्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे पाकिस्तानव्याप्त काश्मीर भागात घुसण्याचे प्रयत्न आहेत, अशी धक्कादायक माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, आयएस एकदम मोठ्या पातळीवर पाकव्याप्त काश्मीर भागात सक्रिय होणार नाही; परंतु काही प्रमाणात का होईना त्यांचा या दिशेने प्रयत्न अाहे, एवढे निश्चितपणे सांगता येईल, असे लेफ्टनंट जनरल के. एस. सिंग यांनी म्हटले आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही शक्यता वर्तवली आहे. अद्यापही पीर पांचाल परिसरात सीमेपलीकडून २०० ते २२५ दहशतवादी देशात घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळही त्या भागात सुरू आहेत. त्याचा धोका आहे. शुक्रवारी झांगर दिन साजरा झाला. ब्रिगेडियर मोहंमद उस्मान यांना १९४७-४८ दरम्यान नौशेरातील राजौरी जिल्ह्यातील संघर्षात वीरमरण आले होते.

नियंत्रण रेषेजवळील संघर्षात दहशतवाद्याचा खात्मा
उरी सेक्टरजवळ शुक्रवारी दहशतवादी आणि लष्कर यांच्यात सकाळी चकमक उडाली. त्यात दहशतवाद्याचा खात्मा झाला. ही घटना बारामुल्ला जिल्ह्यातील बोनयार भागात घडली. त्या भागात तीन ते चार दहशतवादी दडून बसले होते. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर चकमक उडाली. अगोदर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर धुमश्चक्री उडाली. एक जवान जखमी झाला.

अमरनाथ यात्रा मार्गावर अतिरेकी लपले
अतिरेक्यांनी फेसबुकवर आपला सशस्त्र फोटो अपलोड केल्याने खळबळ उडाली. "लव्हर ऑफ रिझवान भाईजान' नावाने हे अकाउंट असून अमरनाथ यात्रा मार्गावर हा फोटो काढण्यात आला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खोऱ्यात छापासत्र सुरू केले असून ज्या युवकांचे यात फोटो आहेत त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे.

प्रथमच जाहीर फोटो
अतिरेक्यांनी प्रथमच या प्रकारे आपले फोटो जाहीरपणे सोशल साइटवर टाकले आहेत. यात एका मंत्र्याच्या घरून दोन एके-४७ रायफल चोरून पळालेला एक पोलिसही आहे. विशेष म्हणजे हिजबुल कमांडर बुऱ्हाण मुजफ्फर वगळता यातील सर्व चेहरे नवे असल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे.

मून यांचा नकार
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करासाठी असलेल्या विशेष कायद्यामुळे राज्यात मानवी हक्काची पायमल्ली झाल्याचा दावा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अहवालावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी नकार दिला. अफस्पा हा लष्कराला विशेष अधिकार देणारा कायदा आहे. त्याचे उल्लंघन होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.

गिलानीस मनाई
फुटीरतावादी नेता सईद अली शहा गिलानी यांची अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारी जाहीर सभा होणार होती, परंतु पोलिसांनी त्याअगोदरच गिलानी यांच्या घराला घेराव घालून त्यांना स्थानबद्ध केले. त्यामुळे त्यांचे मनसुबे उधळले. चिथावणीखोर भाषणातून गिलानी राज्याच्या शांततेला धोका निर्माण करतील, यामुळे पोलिसांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे मानले जाते. डझनावर हुरियत नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

आत्मघाती हल्ल्याच्या मास्टरमाइंडचा खात्मा
वॉशिंग्टन । ‘आत्मघाती हल्ल्याचा मास्टरमाइंड’ अशी आेळख असलेल्या आयएसचा तारिक अल-हार्झी गेल्या महिन्यातील एका धुमश्चक्रीत ठार झाला. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांच्या फौजाच्या हल्ल्यात त्याचा खात्मा झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. तो मुळचा ट्युनिशियाचा होता. सुन्नी अतिरेकी संघटनेत सामील होणारा तो पहिला परदेशी नागरिक होता. हार्झीवर १० लाख डॉलर्सचे इनाम ठेवण्यात आले होते. हार्झीच्या जोरावर आयएसने इराक, सिरियाच्या पलीकडे जाऊन नायजेरिया, इजिप्तपर्यंत आपल्या कारवाया सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे हार्झीचा खात्मा होणे ही अमेरिकेच्या दहशतवादविरोधी लढाईतील मोठी कामगिरी मानली जात आहे.