बाडमेर/जयपूर - भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील संबंध ताणले असले तरी नातेसंबंधांचा धागा अद्याप अतूट आहे. दोन्ही देशांतील राजघराणी २० फेब्रुवारी रोजी एका बंधनात अडकणार आहेत.
पाकिस्तानच्या अमरकोट संस्थानचे व-हाडी भारतात येणार आहेत. पाकिस्तानमधील माजी संस्थानचा राजा हमीरसिंह यांचा मुलगा करणीसिंह वर, तर कनोताचे (जयपूर) ठाकूर मानसिंह यांची कन्या पद्मिनी वधू असेल. पाकिस्तानच्या अमरकोट संस्थानशी सोढा राजपुतांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत. बाडमेर-जैसलमेरच्या सोढांना विशेष निमंत्रण देण्यासाठी राणा हमीरसिंह सोढा कुटुंबासोबत जयपूरला आले आहेत. सोढा कुटुंब आणि करणीसिंह कुटुंबाने मकरसंक्रांतीचा सण एकत्रच साजरा केला. दोन्ही राजघराण्यांतील हे संबंध नव्याने प्रस्थापित झाले नाहीत.
वर करणीसिंह यांचे आजोबा राणा चंद्रसिंह यांचे फाळणीनंतरही भारताशी संबंध राहिले. चंद्रसिंह यांचा विवाह रावतसर घराण्याचे प्रमुख तेजसिंह यांची मुलगी सुभद्रा कुमारी यांच्याशी १९५६ मध्ये झाला होता. राजस्थान पोलिसांचे माजी महानिरीक्षक पी. बलभद्रसिंह राठौर नात्याने हमीरसिंह यांचे मामा लागतात.
वर करणीसिंहच्या कुटुंबाची पाकिस्तानच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यांचे आजोबा राणा चंद्रसिंह पाकिस्तानच्या अमरकोटचे (उमरकोट) संस्थानिक होते. चंद्रसिंह सलग सात वेळेस खासदार आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांचे ते जवळचे मित्र होते.
तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावा वेळी राणा चंद्रसिंह चर्चेत आले होते. पीपीपीपासून विभक्त होऊन त्यांनी पाकिस्तान हिंदू पार्टीची (पीएचपी) स्थापना केली होती. या पक्षाच्या भगव्या झेंड्यात ओम व त्रिशूळाचे चित्र होते. १९९० च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय असेंब्लीची जागा जिंकली आणि नवाज शरीफ सरकारला पाठिंबा दिला होता. २००९ मध्ये त्यांचे निधन झाले. हमीरसिंह आता त्यांचा राजकीय वारसा सांभाळत आहेत.
असे झाले आयोजन
*७ डिसेंबर रोजी पाकिस्तानातील टिळा आणि साखरपुड्यासाठी भारतातून ३० पाहुणे आले होते. जयपूरच्या नारायण पॅलेसमध्ये होणा-या विवाहासाठी जवळपास सातशे वऱ्हाडी थार एक्स्प्रेसने भारतात येतील.
*पाहुण्यांसाठी महाराष्ट्रातून आचारी मागवण्यात आले आहेत. वऱ्हाडात पाकिस्तानचे लोककलाकारही येतील. त्यांची कव्वाली, तर बाडमेर-जैसलमेरचा लंगा व मांगणियार लोकगीतांची धून वाजेल. गुजरातचे तीन हजार पाहुणे १९ फेब्रुवारी रोजी कानोतला येणार आहेत.
पाकमध्ये अद्यापही श्रीमंत हिंदू नेते
एवढ्या वर्षांत मुस्लिम होण्यासाठी बळजबरी केल्याचे कधी ऐकले नाही. इथे ९७ टक्के मुस्लिम आणि १ टक्का हिंदू आहेत. यानंतरही आम्हाला विरोध झाला नाही. पाकिस्तानची अंतर्गत समस्या एका समुदायाची नाही. मंदिरांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात असेल तर मशिदींचेही तसे झाले आहे.-राणा हमीरसिंह