जम्मू - सीमवेर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. आज (शनिवार) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर जम्मूच्या पुच्छ जिल्ह्यात पाकिस्तानाने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यात तीन व्यक्ती ठार झाल्या असून, 15 जण जखमी झालेत. दरम्यान, भारतीय जवानांनीही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. मागील 24 तासांत पाकिस्तानने तिस-यांदा शस्त्रसंधीचा भंग केला.
पाकिस्तानने डागले मोर्टार
पाकिस्तानने फायरिंगमध्ये मोर्टारसह इतर अनेक शस्त्रांचा वापर केला. विशेष म्हणजे नागरी वस्तींवरही सीमेपलीकडून गोळीबार झाला. काही भागात फायरिंग सुरू आहे. पुच्छच्या मेंढर सेक्टरच्या बालाकोटमध्ये सांदाकोट, बसूनी, बरूटी आदी गावांतील अनेक घरांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाकिस्तानची दुतोंडी भूमिका
15 ऑगस्टच्या पर्वावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्यात. शिवाय मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यावर चर्चा केली. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानने गोळीबार केला. त्यामुळे पाकिस्तानची दुतोंडी भूमिका उघड झाली आहे.