आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरी भोवली: कर्नाटकात जनता दलाचे आठ आमदार निलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- राज्यसभेच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत पक्षाचा व्हिप झुगारून अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान करणाऱ्या आठ बंडखोर आमदारांना जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) पक्षातून निलंबित केले आहे.

जद(एस)च्या या आठ बंडखोर आमदारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान न करता काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे जद(एस)चे अधिकृत उमेदवार, उद्योगपती बी. एम. फारूक यांना पराभव पत्करावा लागला होता. राज्य विधानसभेत पक्षाचे ४० आमदार असताना फारूक यांना फक्त ३३ मते मिळाली.

पक्षाचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जद (एस) चे अध्यक्ष, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणाले की, सर्व आठ बंडखोर आमदारांना निलंबित करण्यात आले असून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षाच्या घटनेनुसार तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली जाईल. निलंबित आमदारांनी दिलेले उत्तर ही समिती तपासेल आणि त्यानंतर त्यांच्या हकालपट्टीबाबत निर्णय घेण्यात येईल.

यूपीत भाजपचा एक आमदार निलंबित
लखनऊ- राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याबद्दल भाजपने उत्तर प्रदेशमधील पक्षाचे आमदार विजय बहादूर यादव यांना निलंबित केले आहे. भाजपचे विधानसभेतील गटनेते सुरेश खन्ना यांनी ही माहिती दिली. विजय बहादूर यादव यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले होते.

‘मतदानासाठी वापरलेल्या पेनची न्यायवैद्यक चाचणी करा’
निवडणूक आयोगाने चौकशी करावी : हुडा

चंदिगड- हरियाणात राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी मतदानासाठी वापरलेल्या पेनची निवडणूक आयोगाने न्यायवैद्यक तपासणी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी रविवारी केली. १४ आमदारांची मते रद्द झाल्याने भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा विजयी झाले, तर भारतीय लोकदल आणि काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार आर. के. आनंद यांना पराभव पत्करावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर हुडा म्हणाले की, अशा प्रकारचा कट रचला जाऊ शकतो अशी कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. भाजप समर्थित उमेदवाराच्या विजयासाठीच हा कट रचण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी. आर. के. आनंद यांनीही निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करावा.

काँग्रेसची आज आयोगाकडे धाव
नवी दिल्ली-
हरियाणात राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. पक्षाचे सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद म्हणाले की, काँग्रेसची मते अवैध ठरवण्यासाठीच आमदारांना दिलेले पेन बदलण्यात आले. यामागे मोठा कट असून त्यामागचे सत्य समोर यायलाच हवे.
बातम्या आणखी आहेत...