आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानी पीएमना काशीत क्योटो दिसावे म्हणून २४ तास ‘ऑपरेशन क्लीन’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - काही महिन्यांपूर्वी ज्यांनी काशी पाहिली असेल ते लोक आता तेथे गेले तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल. कारण, काशीचा चेहरामोहराचा आता बदलला आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेले हे शहर सध्या सजवले जात आहे. विमानतळापासून नदीच्या घाटापर्यंत, रस्ते, चौक चमकू लागले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजवणे असो किंवा दुभाजक, घाटावरील छोट्या शीळा असोत किंवा रस्त्याच्या कडेला लोंबणाऱ्या झाडाच्या फांद्या... सगळीकडे दुरुस्ती आिण स्वच्छता सुरू आहे. याचे कारणही तसेच आहे. १२ डिसेंबरला जपानचे पंतप्रधान काशीला भेट देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पण त्यांच्यासोबत असतील. १९६२ नंतर काशीला भेट देणारे एखाद्या देशाचे शिंजो आबे हे पहिले प्रमुख आहेत.

देशभर सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाची काशी सध्या राजधानी ठरली आहे. नगरविकास मंत्रालयाचे सहसचिव प्रवीण प्रकाश यांच्यानुसार, शहराच्या स्वच्छतेसाठी २५ कोटी रुपये देण्यात आले असून अजून निधी दिला जाऊ शकतो. कितीही पैसा लागू द्या, स्वच्छता हवीच, ही भूमिका आहे. दशाश्वमेध घाटाच्या नूतनीकरणावर सर्वाधिक भर आहे. या घाटावरी पायऱ्या स्पष्ट िदसू लागल्या आहेत. सुरेश मांझी याच घटावरून गेल्या ५२ वर्षांपासून आपली नाव काढतात. त्यांचे वय आता ६० वर्षांचे आहे. मात्र त्यांना या घाटाच्या पायऱ्या कधीच दिसल्या नव्हत्या. याच पायऱ्यावरून शिंजो आबे गंगामातेचे दर्शन घेतील. म्हणूनच पायऱ्याच्या फुटलेल्या शिळा बदलल्या जात आहेत. जेथे खड्डे आहेत तेथे सिमेंट भरले जात आहे. या स्वच्छता अभियानाची राेज पाहणी केली जात आहे. या स्वच्छतेची जबाबदारी असलेले महापौर रामगोपाल मोहले यांना रोज कामाचा अहवाल द्यावा लागत आहे. केंद्रीय पर्यटनमंत्र्यांपासून नगरविकास मंत्रालयापर्यंतचे सहसचिव पाहणी करण्यासाठी येत आहेत.

वाराणशीच्या घाटांवर प्रथमच कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. एलईडी लाईटमुळे झगमगाट आहे. घाटावरून दिसणारी दुकाने व घरांचे दरवाजे रंगवले जात आहेत. बनारसी पान आणि चहाच्या शौकिन मंडळींसाठी दुकानदारांनी प्रथमच कचराकुंड्या लावल्या आहेत. हा परिणाम माध्यमांतील प्रसिद्धीचाही आहे. लोक स्वत:हून आता कचराकुंडीत कचरा टाकत आहेत. या स्वच्छता अभियानात अनेक कंपन्याही सहभागी झाल्या आहेत. इंडियन ऑईल कंपनी २०० मेट्रिक टन कचऱ्यापासून खत तयार करण्याचा कारखाना इथे उभारत आहे. दहा ठिकाणी कंपनीचा कचरा व्यवस्थापनाचाही प्रकल्प आहे. शहरात रोज ५५ ते १०० टन फळे व भाज्यांपासून निर्माण होणारा जैविक कचरा साचतो. हा कचरा साठवण्यासाठी शहरात ३० कचरा डेपो असून दिवसभर ६०-७० ट्रक सुमारे ६०० टन कचरा वेचतात. विमानतळ प्राधिकरणानेही कचरा उचलण्यासाठी १० गाड्या दिल्या असून बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने घाटाजवळ १० ठिकाणी बायो टॉयलेट सुरू केले आहेत. ओएनजीसीने १० ठिकाणी पाण्याचे एटीएम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील पाच तयार आहेत. गंगा स्वच्छता अिभयानाचा प्रस्ताव सादर करणारी टाटा मोटर्स ही एकमेव कंपनी असून यात ३५०० कोटी किमतीच्या मशीन्सद्वारे कचरा उचलला जाणार आहे. सध्या तरी हे प्रस्तावाच्या पातळीवर आहे. रूपा फाऊंडेशन शहरात १०० फायबर टॉयलेट बसवणार आहे. १२ डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प् पूर्ण होईल, असा दावा केला जात आहे. गंगेचे विविध घाट स्वयंसेवी संस्थांनी दत्तक घेतले असून, यापूर्वी राणामहल घाटावर उघड्यावरच लोक शौचास जात होते.

येथे शाळकरी मुलांनी पैसे जमा करून शौचालये बांधली आहेत. प्रल्हाद घाट अगोदर पहल या संस्थेस देण्यात आला होता. नंतर कॅनरा बँकेने तो दत्तक घेतला. मनासरोवर व चश्मेश्वर घाट महापालिकेने दिवाळीपूर्वीच स्वच्छ केला आहे.

शहरांना देणार स्वच्छता क्रमवारी
देशातील १७५ शहरांना जानेवारीपासून स्वच्छता अिभयानात क्रमवारी देण्यात येणार आहे. याच आधारे पुढील वर्षी अनुदान दिले जाईल. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ही क्रमवारी देणार आहे.
या कामी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. १-२५ जानेवारीदरम्यान हे काम होईल. नंतर मार्च महिन्यात अशीच क्रमवारी केंद्रीय विद्यापीठांनाही दिली जाणार आहे.
मोदी-आबे यांचा असा असेल दौरा
{ १२ डिसेंबरला दुपारी ३.३० वाजता काशीत दाखल.
{ हॉटेल ताजमध्ये थांबणार, सायंकाळी विश्वनाथ मंदिरास भेट.
{ दशाश्वमेध घाटास भेट, गंगा अारतीला उपस्थिती.
{ ताज हॉटेलमध्ये शाही भोजन होईल.
{ इथेच भेटीगाठी व करारांबाबत चर्चा होईल.
(सुरक्षेच्या कारणावरून सविस्तर कार्यक्रम देण्यात आलेला नाही.)
काशी-क्योटो करारावर स्वाक्षऱ्या
{ मोदी-शिंजो यांच्यात काशीचा क्योटोच्या धर्तीवर विकास करण्यासाठी करार होणार आहे. यानुसार जपान काशीमधील घनकचरा व्यवस्थापनासाठी तांत्रिक व आिर्थक मदत करेल. गंगा कार्ययोजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भारताने ५ हजार कोटींचा प्रस्ताव दिला आहे.
{ जपानी कंपनी जायका पहिल्या टप्प्यात भुयारी गटारींचे काम करत आहे. २०१७ पर्यंत ही कंपनी प्रक्रिया प्रकल्प पण उभा करेल. वारसा स्थळ योजनेअंतर्गत घाट आणि मुख्य मंदिरांपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांमध्येही बदल केला जाणार असून फुटपाथवर भूमिगत केबल आणि एलईडी लाईट लावले जातील. दुसऱ्या टप्प्यात २० अन्य रस्ते असे बांधले जातील.
बातम्या आणखी आहेत...