आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaswant Singh Walks It Alone In Barmer, Scorns 'NaMo Drama' News In Marathi

नमो-नमोचे नाटक भाजपला रसातळाला नेईल : जसवंतसिंह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाडमेर /जयपूर - भाजपने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांनी सोमवारी बाडमेरमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जानंतर त्यांनी सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले, तसेच पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले.

जसवंत म्हणाले- राजनाथ यांनी वेदना देण्याची ही दुसरी वेळ आहे. यामागे वसुंधरा राजे यांचे कारस्थान होते. दोघांनी माझा विश्वासघात केला. मी अडवाणी यांचा आशीर्वाद घेऊन आलो आहे. आता काहीसे मोकळे वाटत आहे. पक्षाबाबत बोलताना ते म्हणाले, नमो-नमोचे नाटक सुरू आहे. याच नाटकामुळे पक्ष रसातळाला जाईल. नरेंद्र मोदी यांना अहंकाराने पछाडले आहे. ते ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन काम करू शकत नाहीत. संपूर्ण पक्ष दोन गटात विभागला आहे.

राजनाथ यांना अध्यक्ष मला विचारूनच केले
नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरू होती तेव्हा कोणाला हे पद द्यावे, अशी विचारणा पक्षाने मला केली होती. तेव्हा मी राजनाथ यांचे नाव सुचविले होते, आणि आज पाहा त्यांनीच माझे तिकीट कापले. या कारस्थानात वसुंधरा यांचाही सहभाग आहे. अखेरची निवडणूक बाडमेरमधून लढण्याची इच्छा आधीच व्यक्त केली होती. पक्षाने शेवटची इच्छाही पूर्ण केली नाही. राजनाथ यांनी दुसर्‍यांदा धोका दिला. 2009 मध्ये जिना वादानंतर पक्षाने ज्या पद्धतीने बाहेर काढले, तसे तर शिपायालाही काढले जात नाही.

माझ्यामुळेच वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या
मी एकदा पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीला निघालो होतो. विमानात माझ्यासोबत अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी होते. त्यावेळी राजस्थानचे नेतृत्व कोणाकडे सोपवावे, अशी चर्चा झाली. तेव्हा मी वसुंधरा राजे यांचे नाव सुचविले. त्यावेळी भैरोसिंह शेखावतही सोबत होते. त्यांनीही वसुंधरा राजेंच्या नावाबद्दल होकार दर्शवला. मी मदत केल्यामुळेच वसुंधरा राजे आज राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या. मात्र, त्याच मला धोका देत आहेत.

जसवंत यांनी मला असेच काढले होते : उमा
पक्ष हा पक्ष असतो याची आठवण जसवंतसिंह यांनी ठेवायला पाहिजे, असे भाजपच्या उपाध्यक्ष उमा भारती यांनी म्हटले आहे. ते जी पद्धत आता सांगत आहेत, त्याच पद्धतीने मला पक्षातून काढण्यात आले होते. मी म्हटले होते, खरी भाजप मीच आहे. मात्र, त्यांनी त्याचा इन्कार केला होता. मोदी-अडवाणी वादावर म्हणाल्या- मोदी अडवाणी यांच्या मुलाप्रमाणे आहेत. आशीर्वाद अवश्य मिळेल.