आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jayalalitha Invited To Form Govt, Panneerselvam Resigns As TN CM

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयललिता रिटर्न्स, ५ वी टर्म; आज चेन्नईत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता शनिवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांची ही पाचवी टर्म असेल. त्यांच्यासह २८ मंत्रीदेखील पद व गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच आठ महिन्यांच्या खंडानंतर तामिळनाडूच्या राजकीय मंचावर पुन्हा ‘अम्मा रिटर्न’चा प्रयोग रंगणार आहे.

जयललिता यांनी शुक्रवारी राज्यपाल के. रोसय्या यांची दुपारी भेट घेऊन आपला दावा सादर केला होता. त्याअगोदर मुख्यमंत्री पनीरसेल्व्हम यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी विधिमंडळ नेतेपदी त्यांची अविरोध निवड करण्यात आली. आठ महिन्यांपूर्वी ६७ वर्षीय जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते.

२७ सप्टेंबर रोजी बंगळुरू न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते, परंतु ११ मे रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात त्यांची सुटका केली. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला होता. आता शनिवारी सकाळी ११ वाजता त्या मद्रास विद्यापीठाच्या प्रेक्षागृहामध्ये आयोजित शपथविधी समारंभात सहकारी मंत्र्यांसह पुन्हा राज्याची सूत्रे हाती घेणार आहेत. एकूण २९ जण शनिवारी शपथ घेतील. दरम्यान, आठ महिन्यांनंतर जयललिता यांचे पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले. राज्यपालांकडे जाणार्‍या त्यांच्या कार आणि मार्गावर लोकांनी उत्स्फूर्तपणे फुलांचा वर्षाव केला. जयललिता यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळपासूनच लगीनघाईचे वातावरण होते. महालासमान त्यांचे घर फुलांनी सजले होते.

जुने चेहरे कायम
जयललिता यांनी नव्या मंत्रिमंडळात जुन्याच चेहर्‍यांना कायम ठेवले आहेत. २०११-१४ दरम्यान त्यांच्या सरकारमध्ये सहकारी राहिलेल्या मंत्र्यांनाच नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यात आे. पनीरसेल्व्हम (अर्थमंत्री), नाथम आर. विश्वनाथम (ऊर्जा व गृह निर्माण), एदाप्पाडी के. पालानीस्वामी, पी. मोहन अशी नावे आहेत.

‘वरुगा थाई’ची होर्डिंग्ज
जयललिता यांची त्यांच्या समर्थकांमध्ये अम्मा अशी आेळख आहे. त्या पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ‘वरुगा थाई ’ (अम्मा तुमचे स्वागत), ‘धर्माचा विजय असो’ अशा आशयाचे होर्डिंग्ज जागोजागी दिसून आले.

अनेक खाती स्वत:कडे
गृह, पोलिस, सामान्य प्रशासन आणि महसूल अशी खाती जयललिता यांनी स्वत: कडे ठेवली आहेत.