आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयललिता पाचव्यांदा मुख्यमंत्री, सहकाऱ्यांनी सामूहिक शपथ ग्रहण करुन रचला इतिहास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अण्णा द्रमुकच्या (एआयएडीएमके) प्रमुख जयललिता पाचव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजता त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांची ही पाचवी टर्म आहे. त्यांच्यासह 28 मंत्र्यांनी देखील पद व गोपनीयतेची शपथ घेतली. जयललिता यांच्या सहकारी मंत्र्यांनी 14 - 14 च्या समुहाने दोन फेऱ्यांमध्ये सामूहिक शपथग्रहण केली. राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदा झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शपथविधी सोहळ्याला सुपरस्टार रजनीकांत उपस्थित होते. त्यांच्याशिवाय जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला, भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री पी.राधाकृष्णन, भाजप नेते एच. राजा आणि एल. गणेशन, भारतीय क्रिक्रेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आयसीसी चेयरमन एन. श्रीनिवासन उपस्थित होते. मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला. जयललिता यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे.
जयललिता यांनी शुक्रवारी राज्यपाल के. रोसय्या यांची दुपारी भेट घेऊन आपला दावा सादर केला होता. त्याअगोदर मुख्यमंत्री पनीरसेल्व्हम यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तत्पूर्वी विधिमंडळ नेतेपदी त्यांची अविरोध निवड करण्यात आली. आठ महिन्यांपूर्वी ६७ वर्षीय जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते.

27 सप्टेंबर रोजी बंगळुरू न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते, परंतु 11 मे रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात त्यांची सुटका केली. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, आठ महिन्यांनंतर जयललिता यांचे शुक्रवारी पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले. राज्यपालांकडे जाणार्‍या त्यांच्या कार आणि मार्गावर लोकांनी उत्स्फूर्तपणे फुलांचा वर्षाव केला. जयललिता यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळपासूनच लगीनघाईचे वातावरण होते. महालासमान त्यांचे घर फुलांनी सजले होते.

‘वरुगा थाई’ची होर्डिंग्ज
जयललिता यांची त्यांच्या समर्थकांमध्ये अम्मा अशी आेळख आहे. त्या पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ‘वरुगा थाई ’ (अम्मा तुमचे स्वागत), ‘धर्माचा विजय असो’ अशा आशयाचे होर्डिंग्ज जागोजागी दिसून आले.

जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा संधी
जयललिता यांनी नव्या मंत्रीमंडळात जुन्या सहकाऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. 2011-14 या कार्यकाळात त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी पुन्हा त्यांच्या सोबत दिसणार आहेत. त्यात त्यांचे सर्वात विश्वासू पन्नीरसेल्वम यांना अर्थमंत्री, एन.आर. विश्वनाथन उर्जा मंत्री, वैद्यलिंगम यांच्याकडे गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे.
अनेक खाती स्वत:कडे
गृह, पोलिस, सामान्य प्रशासन आणि महसूल अशी खाती जयललिता यांनी स्वत: कडे ठेवली आहेत.

पुढील वर्षी विधानसभा निवडणूक
शुक्रवारी राज्यपालांची भेटीनंतर जयललिता यांनी एक प्रकारे त्यांच्या विरोधकांना इशारा दिला आहे, की आता त्या अधिक मजबूत झाल्या आहेत. राज्यापालांच्या भेटीला जाताना एकप्रकारे त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. जणूकाही तो त्यांचा रोड शो होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आता प्रलंबित योजना मार्गी लावाव्या लागतील. कारण पुढील वर्षी (2016 ) विधानसभा निवडणूक आहे. गेल्या सात महिन्यात राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार असतानाही एकही मोठा निर्णय घेतला गेला नाही.