आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jayalalithaa Sentenced To 4 Years In Jail, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: जयललिता यांना 4 वर्षांची कैद, १०० कोटींचा दंडही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याविरुद्ध १८ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या अपसंपदा प्रकरणाचा निकाल शनिवारी लागला. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने जयललिता यांना दोषी ठरवले आहे. त्यांना ४ वर्षांची कैद आणि १०० कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालामुळे जयललिता यांची आमदारकी गेली आहे.
भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा होऊन पद सोडण्याची वेळ आलेल्या त्या पहिल्या मुख्यमंत्री आहेत.
१० वर्षे निवडणूक बंदी : भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्याने शिक्षा पूर्ण झाल्यानंतर ६ वर्षांपर्यंत त्या निवडणूक लढवू शकणार नाहीत. म्हणजेच जयललिता पुढील १० वर्षे निवडणूक मैदानाबाहेर असतील.न्यायालयाने जयललिता यांची मैत्रीण शशिकला, त्यांचे एकेकाळचे दत्तकपुत्र व्ही. एन. सुधाकरन आणि भाची इलावरसी यांनाही दोषी ठरवले आहे. तिघांनाही ४ वर्षांचा तुरुंगवास आणि प्रत्येकी १० कोटींचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. निकालानंतर लगेचच जयललितांना अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी बंगळुरूचा बाहेरील भाग परप्पाना अग्रहारा स्थित मध्यवर्ती कारागृहात अस्थायी न्यायालय तयार करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश जॉन मायकेल डिकुन्हा यांनी निकाल दिला. शिक्षा ठोठावल्यानंतर लगेचच पोलिसांनी जयललिता यांना ताब्यात घेतले, पण त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात आले. हे प्रकरण तामिळनाडूतील असले तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार त्याची सुनावणी कर्नाटकच्या बंगळुरूत सुरू होती. निकालानंतर तामिळनाडूत अद्रमुच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.

पनीरसेल्वम होऊ शकतात मुख्यमंत्री : जयललिता राज्याचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांना मुख्यमंत्री करू शकतात. २००१ मध्येही जयललिता यांना पद सोडावे लागले होते त्यावेळीही पनीरसेल्वम यांना जबाबदारी सोपवण्यात आली होती. या वेळी ऊर्जामंत्री नाथम विश्वनाथन किंवा परिवहनमंत्री सेंथिल बालाजी यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

* जयललितांविरुद्ध ७०० कोटींचा कोळसा आयात घोटाळा, भेटवस्तू घोटाळ्यासह भ्रष्टाचाराचे ४५ खटले सुरू आहेत. तीन वर्षांत तामिळनाडू सरकारने या खटल्यांच्या सुनावणीसाठी तीन विशेष न्यायालये स्थापन केली आहेत.
* जयललिता आणि त्यांच्या सहका-यांनी ३४ बनावट कंपन्या बनवल्या होत्या. या कंपन्यांच्या नावे १०० बँक खाती होती. शशिकला,
सुधाकरन आणि इलारावासी याच कंपन्यांच्या नावावर जयललितांसाठी बेनामी संपत्ती खरेदी करत होते. खरेदीसाठी ते बंद अथवा निष्क्रिय कंपन्या निवडत होते. अशा प्रकारे काळा पैसा पांढरा केला जात होता.

५ वर्षांत कमावले ६० रुपये, संपत्ती ६७ कोटींची
* जयललिता १९९१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या. तेव्हा संपत्ती होती ३ कोटी. त्यांनी १ रुपया मानधन घेतले. म्हणजे ५ वर्षांत ६० रुपये. कारकीर्दीअखेरीस संपत्ती ६७ कोटी झाली.
* त्यांच्या घरावर छापे पडले तेव्हा १०,५०० साड्या, सँडलचे ७५० जोड, ९१ घड्याळे, २८ किलो सोने, ८०० किलो चांदी मिळाली. अनेक घरे, हैद्राबादमध्ये फार्म हाऊस आणि नीलगिरीत चहाबागेची कागदपत्रेही मिळाली.

पुढे काय : जामिनासाठी लागणार वेळ
रविवारच्या सुटीमुळे जयललितांना सोमवारपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. त्यानंतर त्या हायकोर्टाकडून जामीन मागू शकतात. जामिनाला वेळही लागू शकतो. अशाच प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना जामिनासाठी ७२ दिवस लागले होते. जर जयललिता वरिष्ठ न्यायालयात निर्दोष ठरल्या तर त्या पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतात.
महाराष्ट्राचे तीन मुख्यमंत्री पायउतार तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता तुरुंगात गेल्या पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आजवर राज्याचे तीन मुख्यमंत्री पायउतार झाले आहेत. ए.आर. अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि अशोक चव्हाण यांचा त्यात समावेश आहे.