आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयललितांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयद्वारेच व्हावी : दिनकरन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई- तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फतच (सीबीआय) व्हावी यावर आपण ठाम आहोत, असे प्रतिपादन अद्रमुकच्या एका गटाचे नेते टी. टी. व्ही. दिनकरन यांनी सोमवारी केले.  

जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तामिळनाडू सरकारने न्यायमूर्ती ए. अरमुगस्वामी आयोगाची नियुक्ती केली आहे. तुमचा गट या आयोगाला सहकार्य करण्यास तयार आहे का, असा प्रश्न विचारला असता दिनकरन म्हणाले की, आम्हाला सीबीआय चौकशीच हवी आहे. सीबीआय चौकशी झाली तरच जयललितांना रुग्णालयात भेटल्याबद्दल परस्परविरोधी वक्तव्ये करणाऱ्या मंत्र्यांची चौकशी होऊ शकते.  

जयललिता यांना गेल्या वर्षी अपोलो रुग्णालयात दाखल केल्यानंतर कोणीही त्यांची भेट घेतली नव्हती; जयललितांच्या तत्कालीन सहकारी व्ही. के. शशिकला यांच्या भीतीमुळे जयललिता यांनी इडली खाल्ली, असे आपण ‘खोटे’ बोललो, असे वक्तव्य तामिळनाडूचे वनमंत्री दिंडिगुल सी. श्रीनिवासन यांनी अलीकडेच केले होते. दुसरीकडे सहकारमंत्री सेल्लूर राजू यांनी मात्र ‘सर्व मंत्र्यांनी जयललितांची भेट घेतली होती,’ असे परस्परविरोधी वक्तव्य केले होते.  

शशिकलांचा पॅरोलसाठी अर्ज 
सध्या तुरुंगात असलेल्या अद्रमुकच्या प्रमुख व्ही. के. शशिकला यांनी आपल्या आजारी पतीला भेटण्यासाठी १५ दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज केला आहे. ही माहिती त्यांचा भाचा टी. टी. व्ही. दिनकरन यांनी सोमवारी दिली. शशिकला यांचे पती नटराजन यांच्यावर चेन्नई येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे, असे दिनकरन यांनी सांगितले. शशिकला यांनी कर्नाटक सरकारकडे पॅरोलसाठी अर्ज केला आहे. त्यांना परवानगी मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...