रांची - श्वेता दोन्ही डोळ्यांनी अधू असली तरी तिची जिद्द आणि उत्साह भल्याभल्यांचे डोळे दिपवणारा आहे. रांची विद्यापीठात ती पीजीमध्ये मानवी हक्क विषयात पहिली आली. तिला २९ व्या दीक्षांत सोहळ्यात झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री रघुवर दास यांनी सुवर्णपदकाने सन्मानित केले तेव्हा तेथील सर्वांच्याच डोळ्यांत पाणी तरळले. चॅम्पियन बनण्यासाठी डोळे नव्हे तर दृष्टी हवी, हेच तिने सिद्ध केले.
मानवी हक्कांबाबत श्वेता संवेदनशील आहे. यामुळे तिने पीजीसाठी हाच विषय निवडला. दिव्य मराठी नेटवर्ककडे ती म्हणाली, सन्मानाने जगण्यासाठी आपले अधिकार माहीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त डोळेच नव्हे तर दृष्टी (व्हिजन) आणि जिद्दही आवश्यक आहे.
श्वेता सहा वर्षांची असताना तिला ब्रेन ट्यूमर झाला. ऑपरेशन केले; पण त्याचा दुष्परिणाम ९ वर्षांनी दिसून आला. १५ वर्षांची श्वेता सहावीत शिकताना आता कधीही पाहू शकणार नाही, असे निदान डॉक्टरांनी केले. यानंतर श्वेताने शिक्षण हेच जीवनाचे ध्येय ठरवले. तंत्रज्ञानाशीच मैत्री केली. श्वेता सांगते, मला कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमुळे अभ्यासात खूप मदत झाली.
विशेषकरून जॉब एक्स विथ स्पीच या सॉफ्टवेअरमुळे. नॅशनल असोसिएशन ब्लाइंडच्या जमशेदपूर शाखेचे केंद्रप्रमुख अटल सहाय यांचेही मार्गदर्शन लाभले. श्वेताची आई ओमकुमारी आणि पिता अरुणकुमार डॉक्टर आहेत. श्वेता म्हणाली, डिजिटल इंडिया देशाचे घाेषवाक्य आहे. मात्र, दिल्लीत एकाही शिक्षण संस्थेत अंधांसाठी अपडेट अभ्यास सामग्री नाही. ब्रेलमधील पुस्तके कॉलेज, विद्यापीठांत असावी.
जेएनयूतून करतेय एम.फिल.
श्वेताने यूजीसीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपही उत्तीर्ण केली आहे. ती सध्या दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठात एम.फिल. करत आहे. तिला उच्च शिक्षण संस्थांत अध्यापन करायचे आहे.