चंदिगड- गल्लोगल्ली फिरणाऱ्या कुत्र्याचा मृत्यू झाला तर व्यक्ती ढुंकूनही पाहण्याचे सौजन्य करणार नाही. मात्र, तोच कुत्रा प्रतिष्ठितांचा असल्यास कोणावर कशी वेळी येईल सांगता येत नाही. काहीसे असेच घडले आहे चंदिगडमधील एका श्वानाच्या डॉक्टरांसोबत. कुत्र्याच्या मृत्यूमुळे रात्रभर चौकशीला सामाेरे जाण्याची वेळ यांच्यावर आली आहे.
जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती नवज्योत कौर यांच्याकडे ल्हासा एप्सो प्रजातीचा हाचिको नामक कुत्रा होता. त्याच्या अंगावरील केस वाढल्यामुळे कौर यांनी केस कापण्यासाठी त्यास डॉ. अनुज यांच्या रिया पेट केअरमध्ये पाठवले. केस कापताना हालचाल करू नये यासाठी डॉक्टरांनी हाचिकोला अॅनेस्थेशिया या भुलीचे औषध दिले. मात्र, त्यामुळे हाचिको कायमचाच झोपला. डॉ. अनुजच्या मते, न्यायाधीशाच्या नोकराने हाचिकोचा गळा दाबून धरल्यामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी चंदीगडच्या स्टेशन-३६ मध्ये नोकर भगवान दासच्या तक्रारीवरून डीडीआर दाखल करण्यात आले असून डॉ. अनुजला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, पोस्टमार्टेम केल्यानंतर हाचिकोवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस कर्मचारी रामदयाल यांनी सांगितल्याप्रमाणे प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
जपानी चित्रपटांतून प्रेरणा घेत ठेवले होते "हाचिको' हे नाव न्यायमूर्तींनी १९८७ मध्ये प्रदर्शित "हाचिको' या जपानी चित्रपटावरून श्वानाचे नाव ठेवले होते. हा चित्रपट अकिता प्रजातीच्या श्वानाच्या सत्यकथेवर आधारित आहे. तो रोज मालकाला घेण्यासाठी शिबुआ रेल्वेस्थानकावर जायचा. मालकाचा मृत्यू होऊनही त्याच्या प्रतीक्षेत हाचिको मरेपर्यंत ९ वर्षे ९ महिने, १५ दिवसांपर्यंत दररोज रेल्वेच्या वेळेवर स्टेशनवर जात राहिला. यावरून हाचिकोला जपानमध्ये "नॅशनल आयकॉन'चा दर्जा मिळाला आहे. न्यायिक अकादमीत तैनात न्यायमूर्ती नवज्योत कौर यांनी सांगितले की, हाचिको अडीचव्या वर्षांपासून आमच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक बनला होता. डॉक्टरांच्या चुकीनेच त्याचा मृत्यू झाला.