आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jungal Raj In Uttar Pradesh Rape On Three Dalit Girls

उत्तर प्रदेशात ‘जंगल राज’, तीन दिवसांत तीन दलित तरुणींवर अत्याचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदायूं-आझमगड - दोन दलित चुलत बहिणींवरील अत्याचाराच्या प्रकरणाने उत्तर प्रदेश ढवळून निघाला असतानाच आझमगड येथे गुरुवारी रात्री आणखी एका दलित तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडली. तीन दिवसांत महिला अत्याचाराच्या तीन घटनांनी उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. दोन बहिणींवरील अत्याचारप्रकरणी नराधम दोन हवालदारांना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले असून दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा अखिलेश सरकारने केली आहे.

अखिलेश यांचा उर्मट सवाल : उत्तर प्रदेशात महिला सुरक्षित का नाही असा सवाल एका महिला पत्रकाराने कानपूर येथे शुक्रवारी केला होता.त्यावेळी तुम्हाला तर धोका नाही ना ?असा सवाल मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला. महिला पत्रकाराने नाही असे उत्तर दिल्यानंतर अखिलेश म्हणाले,धन्यवाद.आता तुम्हीच सर्वांना जाऊन सांगा.अखिलेश यांच्या उर्मट उलट सवालाने नवा वाद उभा राहिला आहे.
केंद्राची सीबीआय चौकशीची तयारी
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केंद्रीय महिला-बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केला आहे. तसेच सीबीआय चौकशीचीही तयारी दर्शविली. तर लोकसभा निवडणुकीनंतर गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप करून या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी बसपा प्रमुख मायावती यांनी केली.

आझमगडमध्येही घटना
गुरुवारी रात्री आझमगडमध्ये सराईमीर येथे चार नराधमांनी एका 17 वर्षीय दलित किशोरवयीन तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली.
आरोपींसह हवालदार फरार
दोन हवालदार छत्रपाल यादव आणि सर्वेश यादव यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुमार सक्सेना यांनी दिली. हवालदारांसह सात आरोपी असून त्यापैकी हवालदार सर्वेश, दोन यादवबंधू पप्पू,अवधेश यांना अटक करण्यात आली. इतर चौघे उर्वेश, हवालदार छत्रपाल आणि इतर दोन आरोपी फरार आहेत.
केंद्र सरकारला अहवाल सादर
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारकडून तपशीलवार अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान, अखिलेश सरकारने मृत बहिणींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. कुटुंबीयांना पूर्ण संरक्षण व आवश्यक ती मदत करण्याचेही आश्वासन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले.
गावात संतापाची लाट
उशेत गावात मंगळवारी रात्री दोन चुलत बहिणी शौचालयासाठी गेल्या होत्या. त्यांच्यावर दोन हवालदारांसह एकूण सात जणांनी सामूहिक कुकर्म केले. दोघींचे मृतदेह दुसर्‍या दिवशी सकाळी गावातील एका झाडाला टांगलेले आढळून आले. यामुळे गावात संतापाची लाट उसळली.