रोहतक (हिमाचल प्रदेश)- प्रियकराच्या मदतीने कुटुंबातील सात सदस्यांची गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय सोनम नावाच्या युवतीला सेशन कोर्टाने दोषी घोषित केले आहे. कबूलपूर या गावात 2009 मध्ये ही घटना घडली होती. सोनमचा 22 वर्षिय प्रियकर नवीन आणि या दोघांना मदत केल्याच्या आरोपावरून जसबीर यालाही दोषी घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणी सेशन कोर्टाचे न्यायाधीश सुशीलकुमार गुप्ता उद्या (6 मार्च) शिक्षा सुनावणार आहे.
हत्या करण्यापूर्वी दिले गुंगीचे औषध
कबूलपूर येथील भूपेंद्रसिंह यांनी पोलिस तक्रार दिली होती, की 14 सप्टेंबर 2009 रोजी रात्रीच्या सुमारास मोठे बंधू सुरेंद्र यांची मुलगी सोनम हिने नवीन उर्फ मोनू याच्या मदतीने गुंगीचे औषध देऊन सात कुटुंबीयांची हत्या केली.
यांची केली होती हत्या
सोनमने तिची आजी भूरी देवी (60 वर्ष), वडील सुरेंद्रसिंह (40 वर्ष), आई प्रमिला (38 वर्ष), भाऊ अरविंद (18 वर्ष), भूपेंद्र यांच्या मुली सोनिका (14 वर्ष), मोनिका (12 वर्ष) आणि भूपेंद्र यांचा मुलगा विशाल (8 वर्ष) यांची गळा दाबून हत्या केली.
पोलिसांना कसा आला संशय
फॉरेंसिक रिपोर्ट आणि नवीनने सोनमला दिलेले बनावट पत्त्याचे सिम यामुळे सोनम आणि नवीन यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला. घरात उभ्या असलेल्या बाईकच्या साईड मिररवर एका युवकाचे फिंगर प्रिंट पोलिसांना सापडले होते. पोलिस तपासात ते नवीनचेच असल्याचे सिद्ध झाले.