नवी दिल्ली- ओडिशामध्ये 2008 या वर्षी उसळलेल्या दंगलीत एका ननवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांना दोषी घोषित केले असून सहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
कटक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी 2010 पासून सुनावणी सुरू होती. आरोपींची बाजू मांडताना त्यांच्या वकीलाने आज न्यायालयाला सांगितले, की गुन्हा घडल्यानंतर बऱ्याच महिन्यांनी ननने पत्रकार परिषद घेऊन या दंगलीदरम्यान बलात्कार झाल्याचे सांगितले होते. असे असतानाही ओडिशा राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्लीला जाऊन त्यापूर्वी पीडितेचा जबाब कसा काय नोंदविला? ननच्या ओळखीवरच आम्ही साशंक आहोत. पीडितेने दिलेल्या जबाबाची खात्री पटविणे आवश्यक आहे. त्यात फेरफार करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे.
जालेसपाटा आश्रमात विश्व हिंदू परिषदेचे नेते लक्ष्मणानंद सरस्वती यांची हत्या झाल्यानंतर कंधमाल जिल्ह्यात दंगली पेटल्या होत्या. यात 38 नागरिक मृत्युमुखी पडले होते.
माझ्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर मला मारहाण करण्यात आली. मला विवस्त्र अवस्थेत रस्त्यांवर फिरविण्यात आले, अशी तक्रार या पीडित ननने दिली आहे.