आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकही आमदार भाजपत जाणार नाही; मुख्यमंत्री सिद्धरमय्यांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- काँग्रेसचा कुठलाही आमदार भाजपत जाणार नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी रविवारी स्पष्ट केले. काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचा भाजपचा दावा खोटा आहे. हा पक्ष खोट्या बातम्या पसरवत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मैसुरू येथे पत्रकारांशी चर्चा करताना सिद्धरमय्या म्हणाले की, भाजपचे नेते याआधीही असे खोटे बोलले आहेत. काँग्रेसचा एकही आमदार भाजपमध्ये जाणार नाही. एवढेच काय, ते त्यांचे डोके आणि चेहराही भाजपकडे वळवणार नाहीत. असे खोटे बोलून त्यातून राजकीय फायदा मिळवता येईल, असे भाजपला वाटते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येदियुरप्पा यांची ती रणनीती आहे.
‘काँग्रेस हे बुडते जहाज असून सत्ताधारी काँग्रेससह अनेक राजकीय नेते भाजपशी चर्चा करत आहेत. निवडणुका जवळ येत आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा आहे. लवकरच अनेक ज्येष्ठ नेते भाजपमध्ये येतील,’ असे वक्तव्य येदियुरप्पा यांनी रायचूरमध्ये केले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे पुढील महिन्यात मागासवर्गीयांच्या मेळाव्यासाठी कर्नाटकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या वेळी इतर पक्षांचे काही नेते भाजपत प्रवेश करतील, अशी अपेक्षा आहे. सिद्धरमय्या यांनी २० जूनला राज्य मंत्रिमंडळाची फेररचना करताना १४ मंत्र्यांना अर्धचंद्र दिला होता, तर १३ नव्या मंत्र्यांचा समावेश केला होता. तेव्हापासून सत्ताधारी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेले आणि मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले अनेक जण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खुलेपणाने बोलत आहेत. मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी १७ ऑक्टोबरला आमदारपदाचा राजीनामा दिला अाहे. त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणाही केली आहे. मात्र ते कोणत्या पक्षात जाणार याबद्दल त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल हे दोन्ही पक्ष त्यांच्या संपर्कात असल्याचे कळते.
बातम्या आणखी आहेत...