आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर विधानसभेत आमदारांची दांडगाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- नवीन प्रशासकीय शाखांची मागणी ‘दुर्लक्षित’ केल्याचा आरोप करत जम्मू- काश्मीर विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रचंड दांगडू घातला. सभागृहाचे कामकाज रोखून धरत विरोधकांनी टेबल- खुच्र्या पालथ्या घातल्या. सभागृहातील माइक तोडले. या गोंधळात वेलमध्ये रिपोर्टिंग टेबलवर चढून निषेध आंदोलन करणारे पीडीपीचे आमदार मुश्ताह शहा जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी अपक्ष आमदार इंजिनिअर राशीद यांनी मंत्र्यांच्या समोर ठेवलेला माइक उखडून फेकला. तीन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करूनही गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे विधानसभा अध्यक्ष
मुबारक गुल यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
जम्मू-काश्मीर विधानसभेचे कामकाज सुरू होताच पीडीपी या मुख्य विरोधी पक्षाच्या आमदारांनी नवीन प्रशासकीय शाखांच्या स्थापनेत भेदभाव केला जात असल्याचा आरोप करत गोंधळ सुरू केला. पीडीपी आमदार चौधरी जुल्फीकार व अन्य आमदारांनी हातात पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी सुरू केली. विधानसभा अध्यक्ष मुबारक गुल यांनी त्यांना शांत होण्याचे आवाहन केले. तोच जुल्फीकार यांनी टेबल पालथा केला आणि वेलमधील रिपोर्टिंग टेबलजवळ घोषणाबाजी करत थेट टेबलावरच चढले. अन्य आमदारांनीही जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. सभागृहात नेमके काय चालले हे कोणालाच कळत नव्हते. त्यामुळे अध्यक्षांनी पंधरा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
मार्शल्स- आमदारांतही हातघाई
दुसर्‍यांदा जेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेव्हा पीडीपी, भाजप, पँथर्स पार्टीचे आमदार गोंधळ घालतच सभागृहात आले आणि त्यांनी टेबल- खुच्र्यांची फेकाफेक सुरू केली. गोंधळ घालणार्‍या आमदारांना बाहेर काढण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी मार्शल्सना दिले. तेव्हा मार्शल्स आणि आमदारांमध्येही झटापट झाली. अपक्ष आमदार इंजिनिअर राशीद यांनी मंत्र्यांच्या समोरील माइक उखडून फेकला.
टेबलावरून आमदार पडला
तिसर्‍यांदा कामकाज सुरू झाल्यानंतरही पीडीपीचे आमदार घोषणाबाजी करत रिपोर्टिंग टेबलवर चढले. मार्शल्सनी त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. याच गोंधळात टेबलावर चढलेले तराळचे आमदार मुश्ताक अहमद खाली पडून जखमी झाले. त्यांच्या पाठीला जबर दुखापत झाली.
लोकप्रतिनिधींचे लज्जास्पद वर्तन
लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे लज्जास्पद वर्तन पाहायचे असेल तर जम्मू-काश्मीर विधानसभेत टेबलावर उभे राहिलेले विरोधक पाहा. आमच्या नव्या निर्णयामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट
ओमर यांना ट्विटच प्यारे
लोक निषेध व्यक्त करत आहेत. आमदार रक्तबंबाळ झाले आहेत आणि ओमर अब्दुल्ला मात्र ट्विट करण्याला प्राधान्य देत आहेत. सभागृहात येण्याऐवजी त्यांनी ट्विट करणेच पसंत केले. मेहबुबा मुफ्ती, विरोधी पक्षनेत्या