आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashmir Fake Encounter: Colonel, 5 Others To Face Court Martial

बनावट चकमक प्रकरण: कर्नल, मेजरसह 6 जणांचे कोर्ट मार्शल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - बनावट चकमकीप्रकरणी लष्कराने बुधवारी दोन अधिकार्‍यांसह चार जवानांच्या कोर्ट मार्शलचे आदेश दिले. जम्मू-काश्मिरातील मचेल सेक्टरमध्ये एप्रिल 2010 मध्ये ही घटना घडली होती. यानंतर दोन महिन्यांपर्यंत काश्मिरात हिंसक निदर्शने झाली होती. या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 123 जणांचा मृत्यू झाला होता.
कर्नल डी.के. पठाणिया, 4 राजपुताना रेजिमेंटचे सीओ मेजर उपिंदर व चार जवानांचे कोर्ट मार्शल होणार आहे. 30 एप्रिल 2010 रोजी कुपवाडा जिल्ह्यात लष्कराने तीन घुसखोरांना ठार मारल्याचा दावा केला होता. मृत पाकचे अतिरेकी असल्याचे सांगितले गेले. मात्र बारामुल्लातील नदीहालचे मोहंमद शफी, शहजाद अहमद आणि रियाझ अशी त्यांची ओळख पटवण्यात आली. तिघांना घरातून उचलून सीमेवर नेऊन गोळ्या घातल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप होता. सविस्तर तपासानंतर लष्कराने कोर्ट मार्शलचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिसांनी एक कर्नल, एक मेजर व इतर सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. आरोपींनी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने सोपोरमधून तिघांचे आधी अपहरण केले, यानंतर ते अतिरेकी असल्याचे सांगून त्यांची हत्या केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.