आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kedarnat Safe For Religious. Jaiprakash Pawar On Spot Report Of Kedarnath

केदारनाथ यात्रेकरूंसाठी सुरक्षित; रस्ते, पूल, धर्मशाळा झाल्या आधुनिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरीकुंड- देवभूमी उत्तराखंड राजकीयदृष्ट्या तापलेली असली तरी देशभरातील भाविकांसाठी केदारनाथ-बद्रीनाथासह गंगोत्री-यमुनोत्री या चारधाम यात्रेची कवाडे मेच्या प्रारंभालाच खुली होत आहेत. देवभूमीतील दोन वर्षांपूर्वीच्या प्रलयानंतर अस्ताव्यस्त झालेले जनजीवन आता खऱ्या अर्थाने पूर्ववत झाले आहे.

उखडलेले रस्ते, जायबंदी झालेले लहान-मोठे पूल, धर्मशाळा, हॉटेल्स यांसह आरोग्याच्या सोयी-सुविधा, तसेच अत्याधुनिक संपर्क यंत्रणा यामुळे यंदाची यात्रा वास्तवात सुरक्षित होऊ शकेल, असा दावा स्थानिक प्रशासनातील अनेक प्रमुखांनी केला आहे.

उत्तराखंडचे अर्थकारण हे पूर्णत: चार धाम यात्रांसह पर्यटनावर अवलंबून आहे. यात्रेकरू अन् पर्यटकांनी इकडे दुर्लक्ष केले की त्याचा विपरीत परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होतो. केदारनाथमधील प्रलयाचे दूरगामी परिणाम संबंध उत्तराखंडवर जाणवू लागले होते. निसर्गाचे अक्राळविक्राळ रूप ज्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या अनुभवले त्यांनी अक्षरश: तिकडे कानाडोळा केला. ही परिस्थिती अशीच राहिली तर उत्तराखंडला उपासमारीच्या संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तेथील राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याचे धाडस दाखवित केदारनाथ, गौरीकुंड, सोनप्रयागसह पंचक्रोशीतील असंख्य गावांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेतले. स्थानिकांची साथ प्रशासनाची इच्छाशक्ती याच्या बळावर आजघडीला हरिद्वार वा हृषिकेश येथपासून ते केदारनाथ-बद्रीनाथ-गंगोत्री-यमुनोत्री या ठिकाणापर्यंतचे प्रमुख मार्गांचे रुंदीकरण डांबरीकरण केले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, केदारनाथ मंदिराकडे जाणारी तब्बल २१ किलोमीटरची पायवाट ही पक्क्या स्वरूपाची बांधतानाच रुंदीकरण, ठिकठिकाणी निवाराशेड, आरोग्य पथकांची नियुक्ती, निसर्गचक्रातील अचानक होणारे बदल लक्षात घेऊन भाविकांच्या मदतीला धावून जाणारी विविधांगी पथके, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित राज्य केंद्रीय स्तरावरील पथकांची नियुक्ती अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केदारनाथ मार्गावर यात्रा काळात वावर असणारा प्रत्येक यात्रेकरू हा अत्याधुनिक संपर्क यंत्रणेमुळे प्रशासनाच्या निगराणीमध्ये राहणार आहे. या मार्गावरील उंच डोंगर-दऱ्यांत पायी चालताना श्वसनासह दम लागणे वा अन्य त्रास जाणवू नये म्हणून चढाईचा त्रास कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. उत्तराखंड प्रशासनाने केदारनाथ यात्राकाळात घेतलेल्या या खबरदारींमुळे देशभरातून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी तुलनेने पर्जन्यमान कमी असल्याने हवामानही चांगले आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने यंदा केदारनाथच्या गौरीकुंड ते बद्रिनाथ मार्गावरील जोशीमठापर्यंतचे सर्वेक्षण केले असता गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत चांगल्या सुधारणा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे उत्तराखंडचे वातावरण राजकीयदृष्ट्या तापलेले असले तरी धार्मिकदृष्ट्या हाच काळ भाविकांना यात्रेची पर्वणी साधण्याजोगा झाला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा...
संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही, वायफाय...चांगले हवामान हे शुभसंकेत...इच्छुक यात्रेकरूंची संख्या चाैपट...महाराष्ट्र, गुजरातमधून सर्वाधिक प्रतिसाद