आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kedarnath Priligrim News In Marathi, Divya Marathi

केदारनाथ यात्रा : 22 किमीचा हा आहे जीवघेणा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंडहून चारधाम यात्रा सुरू झाली आहे. दरवर्षी ज्या यात्रेसाठी 15 हजार यात्रेकरू ‘जय शिव’चा जयघोष करत एकत्र निघत होते तेथे आज शंभर लोकही नाहीत. मागील वर्षी झालेल्या विध्वंसाच्या खाणाखुणा या परिसरात ठिकठिकाणी आजही कायम आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली काही पाऊलवाटा तयार करण्यात आल्या ख-या, पण आजूबाजूला जमिनीतून मृतदेह डोकावताना दिसून येतात. त्यांच्या दुर्गंधीमुळे तीर्थयात्रेचे औचित्यच संपुष्टात आणले आहे.

सोनप्रयागहून केदारनाथ यात्रा सुरू होते आणि गेल्या वर्षी ढगफुटीमुळे उद्ध्वस्त झालेला परिसरही येथूनच सुरू होतो. सहा किलोमीटर पुढे असलेल्या गौरीकुंडापर्यंत ज्या रस्त्यावरून कार आणि बसेस धावत होत्या त्या रस्त्याचे आज नामोनिशाणही नाही. गौरीकुंडच्या आधी एक ठिकाण आहे बडा पडाव. येथे होणा-या कार आणि बस पार्किंगमुळे त्याला हे नाव देण्यात आले आहे. विध्वंसानंतर येथील परिस्थिती बदललेली नाही. मागच्या वर्षी अडकलेल्या कार आणि बसेस तशाच खटारा झाल्या आहेत. येथून रामबाडापर्यंतचा पाच किलोमीटरचा प्रवास सुरू होतो. मंदाकिनी नदीच्या काठाकाठाने एक पाऊलवाट. कधी काळी वर्दळ असणा-या या परिसरात आज भयावह शांतता आहे आणि रामबाड्याला पोहोचल्यानंतर डोळ्यासमोर येते ते भयावह चित्र. रामबाडा पुलाच्या बरोबर खाली अर्धवट जळालेले मृतदेह, हाडे, कपडे आणि ढिगारे. हे हाल मुख्य रस्त्याचे आहेत. रस्ता सोडून वरच्या जंगलामध्ये डोकावले तर काटेरी झुडपांना अडकलेले कपडे, मानवी अवयव सरकार आणि प्रशासनाने कुठेच कशाला हात लावला नसल्याची साक्ष देत आहेत. मागील वर्षी लष्कराने येथून माघार घेताच सर्व काही परिस्थितीवर सोडून देण्यात आले आहे.

रामबाडाहून केदारनाथपर्यंतचा मार्ग दुरुस्त करताना प्रशासनाने 7 किलोमीटरचा प्रवास 12 किलोमीटर केला आहे. या मार्गावर मृतदेह तर सापडले नाहीत, मात्र केदारनाथला पोहोचताच हृदय पिळवटणारे दृश्य समोर येते. ढिगारे जसेच्या तसेच आहेत. पाच वेळा बर्फवृष्टी होऊनही माशा घोंगावत आहेत. चोहीकडे भयंकर दुर्गंधी. उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते अजय भट्ट यांच्या मते, मंदिराच्या समोर अजूनही मृतदेह गाडलेले आहेत. आधी ते काढून टाकले पाहिजेत. बर्फामध्ये मृतदेह टिकून राहिले आहेत. परंतु जसजशी उष्णता वाढेल तेव्हा असह्य होऊन बसेल. दुर्घटनेच्या 11 महिन्यांनंतरही सरकार ढिगारे व मृतदेह काढू शकले नाही. प्रशासनाने रस्त्यावरचा बर्फ हटवला आणि संकटाची भीषणता पडदे टाकून झाकण्याची तयारी चालवली आहे. सरकारने केदारनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्यावरच सर्व लक्ष केंद्रित करून परिस्थिती आणखीच बिघडवली आहे.

ना राहण्याची व्यवस्था ना खाण्यापिण्याची सोय
22 किलोमीटरच्या या रस्त्यावर सोनप्रयागपासून किमचोलीपर्यंत राहण्याची किंवा खाण्यापिण्याची काहीही व्यवस्था नाही. यात्रेकरूंसाठीची आरोग्य शिबिरेही किमचोली आणि गौरीकुंडाजवळ आहेत. यात्रेकरू कसे तरी केदारनाथपर्यंत पोहोचले तरी तेथे ते थांबणार कुठे ? तेथे ना थांबण्याची व्यवस्था आहे ना जेवणाची! येथे अजूनही हिमवृष्टी सुरूच आहे.

मंदिर परिसरातील ढिगारे उपसण्यावरूनही राजकारण
मंदिर परिसरातील ढिगारे उपसण्यावरूनही राजकारण होत आहे. कारण येथील बहुतांश घरे स्थानिक पुजा-यांच्या मालकीची आहेत. ढगफुटीनंतर सरकारने सहा महिन्यांत सर्व अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे असे होऊ शकले नाही. नंतर निवडणूक आली. आता लोकसभा निवडणुकीनंतरच या मुद्द्यावर चर्चा होईल, असे म्हटले जात आहे. मंदिर संस्थानचे उपव्यवस्थापक रुद्रप्रयाग यांनी सांगितले की, केदारनाथ मंदिर परिसरातील ढिगारे हटवण्यासाठी तज्ज्ञांचे मत घेतले जात आहे. ढिगा-याखाली काय आहे, हे तेव्हाच कळेल.
नवे पूलही डगमगते, ढासळणारे
रामबाड्याहून किमचोली आणि सोनप्रयागपासून गौरीकुंडला जोडणारा पूल आतापासूनच हलतोय तसेच ढासळत आहे. सोनप्रयाग येथील पूल तर मातीवरच उभारण्यात आला आहे. तिकडे सोनप्रयागपासून गौरीकुंडपर्यंत नदीकिनारी बांधण्यात आलेला रस्ताही थोड्याशा पावसाने वाहून जाईल.
मृतांचा आकडाही
संभ्रमात टाकणारा
6000 मृत्यू
संरक्षणमंत्र्यांच्या संसदेतील माहितीनुसार
15-20 हजार
गैरसरकारी आकडा
राज्यांना प्रतीक्षा आपल्या नागरिकांची
एकूण बेपत्ता : 4120
उत्तर प्रदेश 1150
उत्तराखंड 852
मध्य प्रदेश 542
राजस्थान 511
दिल्ली 216
महाराष्ट्र 163
गुजरात 129
हरियाणा 112
बिहार 58
इतर 387
डीएनए नमुन्यांचा अहवाल अजून आलाच नाही
मृतांची ओळख पटवण्यासाठी सरकारने 1000 मृतदेहांचे डीएनए नमुने घेतले. अचूक ओळख पटण्यासाठी तेथे नातेवाइकांच्या शोधात आलेल्या लोकांचेही डीएनए नमुने घेण्यात आले. हे सर्व नमुने हैदराबादला पाठवण्यात आले. त्यानंतर मृतदेह दहन केले गेले. मात्र, 11 महिन्यांनंतरही अहवाल आला नाही.