आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kedarnath Temple News In Marathi, India, Uttarakhand

आप्तस्वकीय अजूनही परतण्याची प्रतीक्षा; केदारनाथाचे भाविक घटले पण श्रद्धा कायम!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केदारनाथच्या वाटेवरून- गेल्या वर्षी केदारनाथ दुर्घटनेत हजारो भाविकांचे प्राण गेले. त्यामुळे केदारघाटीला स्मशानाचे रूप आले होते. परंतु श्रद्धेपोटी या वर्षीही भाविकांनी केदारनाथ गाठून दर्शन घेतले. यंदा भाविकांची संख्या मोजकीच होती. त्यामध्ये अनेक जण आपले आप्तस्वकीय भेटतील या आशेपोटी आले होते.

केदारनाथच्या वाटेवरील गावागावात ठिकठिकाणच्या भिंतींवर बेपत्ता भाविकांचे फोटो लावले असून यावर गुमशुदा की तलाश, नातेवाइकांचे फोन नंबर, संपूर्ण पत्ता दिला आहे. शोधून देणार्‍याला सुमारे 21 लाखांपर्यंतचे बक्षीसदेखील ठेवण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये जाणारे यात्रेकरू सहसा गंगोत्री, जमनोत्री, केदारनाथ व बद्रीनाथ या चार धामांची यात्रा करून दर्शन घेतात. या चारही धामांच्या रस्त्यावर असणारी वर्दळ नाहीशी झाली आहे. रस्त्याने अगदी तुरळक पाच-पंचवीस वाहने जाताना-येताना दिसतात.

बालकांची आर्त हाक
रुद्रप्रयागाहून केदारनाथला जाताना नदीच्या किनार्‍यावरील सर्व हॉटेल्स मंदाकिनी नदीने गिळंकृत केलेल्या आहेत. जाताना उजव्या बाजूला काही हॉटेल्स शिल्लक आहेत. त्या हॉटेल्स प्रवाशांची वाट पाहत आहेत. आपल्या हॉटेल्समध्ये यात्रेकरू यावेत, त्यांनी मुक्काम करावा म्हणून हॉटेल्स मालकासह त्यांचे सर्वच कुटुंब रस्त्यावरून धावणार्‍या वाहनाला हात करून थांबवण्याची विनंती करतात. लहान बालकांची ही विनवणी पाहून तर हृदय पिळवटून येते.

सहज दर्शन
केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी विध्वंसापूर्वी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागायचा, परंतु आज मंदिरात सहज जाता येऊन तुम्हाला पूजाअर्चा व अभिषेकही सहज करता येतो. मंदिरासमोर असलेले पानफूल व प्रसादाचे एकही दुकान शिल्लक राहिले नाही. यात्रेकरूंची सोय व्हावी म्हणून हेलिपॅडकडे जाणार्‍या वाटेवर प्रसाद व पानफुलाची दोन दुकाने आहेत, तर गढवाल विकास मंडळाने हेलिपॅडशेजारी अन्नछत्र उघडले आहे.