आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाडी राज्यांत पुन्हा जलप्रलयाचा इशारा, केदारनाथ मार्गावरील पूल, रस्ते गेले वाहून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे - Divya Marathi
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे
देहरादून-नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये आगामी ७२ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. खराब हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा तूर्त स्थगित करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी सोनप्रयाग आणि गौरीकुंड यांच्यातील मंदाकिनी नदीवरील महत्त्वपूर्ण पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे मंदाकिनी नदी कोपली आहे. केदारनाथकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु हा पूल मंदाकिनी नदीत वाहून गेला आहे.

मुख्य वाहतूक याच मार्गावरून होते, अशी माहिती रुद्रप्रयागचे जिल्हाधिकारी राघव लँगर यांनी दिली. वाहतूक पूर्ववत झाल्यानंतरही सध्या सोनप्रयागहून पुढे जाण्यास भाविकांना परवानगी देता येणार नसल्याचे लँगर यांनी स्पष्ट केले. त्या मार्गावर दरडी कोसळल्या आहेत. केदारनाथ, लिनचोली, भीमबली, जंगलचट्टी, गौरीकुंड, सोनप्रयागसह अन्य ठिकाणी ७०० हून अधिक यात्रेकरूंना थांबावे लागले आहे. सोनप्रयागहून अनेक यात्रेकरू गुप्तकाशीकडे परतले आहेत. केदारनाथमध्ये ३५०, लिनचोली-७७, भीमबली-६०, जंगलचट्टी-२०० गौरीकुंडमध्ये २१३ यात्रेकरूंना मुक्काम करावा लागला आहे.

९०० अडकले
चारधाम यात्रेच्या मार्गावर संततधार पाऊस सुरू असल्याने ९०० यात्रेकरू अडकून पडले आहेत. परंतु प्रशासनाने भाविकांना सुरक्षित िठकाणी व्यवस्था करून दिली आहे.

महामार्गाचे नुकसान
गौरीकुंड ते सोनप्रयागदरम्यानचा महामार्गाची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. गौरीकुंड भागात अनेक वाहने अडकून पडली आहेत. महत्त्वाचे सहाहून अधिक मार्ग उघडले आहेत.

सात हेलिकॉप्टर
प्रशासनाने महामार्गावर अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी सात हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे. त्यापैकी पाच हेलिकॉप्टर जोशीमठ आणि दोन मंदाकिनी खोर्‍यात तैनात करण्यात आले आहेत.

चौथा जत्था थांबवला
धारचुला परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे मानसरोवरकडे जाणार्‍या यात्रेकरूंचा चौथा जत्था थांबवण्यात आल्याचे शुक्रवारी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यात ५७ भाविक आहेत. वातावरणात बदल झाल्यास हे भाविक शनिवारी पुढे जाऊ शकतील.

गोविंदघाटावर मुक्काम
हेमकुंड साहिबसाठी सुमारे ५ हजार भाविक निघाले होते. परंतु वादळी पावसामुळे त्यांना घांघारिया परिसरात थांबावे लागले आहे. गोविंदघाट भागात अगोदरच १ हजार २०० भाविक थांबले आहेत. अलकनंदा नदी कोपल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणाहून पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मान्सूनच्या दुसर्‍या दिवशी हाल
उत्तराखंडमध्ये मान्सूनने गुरुवारी प्रवेश केला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे हजारो यात्रेकरूंची हिरमोड झाला आहे.

मान्सूनने देश व्यापला
नैऋत्य मोसमी पावसाने शुक्रवारी संपूर्ण देश व्यापला, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. वास्तविक सामान्यपणे देशव्यापी मान्सूनची तारीख १५ जुलै असते. परंतु यंदा मान्सूनने देश कमी कालावधीत पादाक्रांत केला.

काश्मीरमध्ये सुधारणा
गुरुवारी कोपलेल्या झेलम नदीच्या पाणीपातळीत शुक्रवारी काही प्रमाणात घसरण झाल्याने काश्मिरी जनतेला दिलासा मिळाला आहे. अनंतनाग जिल्ह्यात गुरुवारी नदीची पाणीपातळी २७ फुटांहून अधिक होती. शुक्रवारी २३ फुटांवर आली होती.
बातम्या आणखी आहेत...