तिरुवनंतपुरम - केरळच्या एका ख्रिश्चन धर्मगुरूने महिलांच्या पोशाखांवर अत्यंत वादग्रस्त भूमिका मांडली आहे. जीन्स, टी-शर्ट वापरून महिला-मुली पुरुषांच्या वासनांना उत्तेजना देतात. अशा महिलांना समुद्रात बुडवले पाहिजे. चर्चमध्ये प्रार्थनेदरम्यान त्याने ही मते मांडली. या धर्मगुरूचा हा व्हिडिओ गेल्या ११ महिन्यांपासून यूट्यूबवर प्रसारित झाला आहे. याला आता पुन्हा शेअर करण्यात आले आहे. शेअर करणाऱ्याने सांगितले की, त्याने हा व्हिडिओ शैलोम टीव्हीवरून घेतला आहे.
या व्हिडिआेमध्ये धर्मगुरू म्हणतो की, चर्चमध्ये प्रार्थना करताना आपण या गोष्टींचे निरीक्षण केले आहे. मुली उत्तान जीन्स आणि टी-शर्ट परिधान करून चर्चच्या पहिल्या रांगेत येऊन बसतात. त्यांना पाहून मागे बसलेला युवावर्ग उत्तेजित होतो. त्यांचे लक्ष प्रार्थनेत लागत नाही. हा व्हिडिओ मल्याळम भाषेत आहे. प्रार्थना घेण्यास चर्चमध्ये गेल्यावर मला तेथून पळून जावे वाटते. तेथे बसलेल्या तरुणी पाहिल्यावर त्यांना लाथा मारून हाकलून लावण्याची इच्छा होते. त्या जीन्स, ट्राउझर्स, शर्ट,टी-शर्टमध्ये येतात. मोकळे केस सोडून आणि हातात फोन घेऊन त्या लक्ष वेधत असतात. त्या चर्चमध्ये अशा का येतात, हेच मला कळत नाही.
माझा महिलांना प्रश्न आहे - कॅथॉलिक चर्च तुम्हाला पुरुषांचे वस्त्र वापरण्याची परवानगी देते का? चर्चचा विषय थोडा बाजूला ठेवू. बायबलमध्ये हे मान्य आहे का? पुरुषांनी महिलांची वस्त्रे आणि महिलांनी पुरुषांची वस्त्रे वापरू नयेत, असा संदेश बायबल देते, असे या धर्मगुरूचे म्हणणे आहे. तुम्ही असे करून ईश्वराचा अपमान करत आहात. तुम्ही ईश्वरविरोधी कृती करत असून दयेस पात्र आहात का? अनेक तरुण प्रार्थनेनंतर मला येऊन भेटतात. अर्धनग्न मुलींना चर्चमध्ये पाहून आमच्या मनात पाप निर्माण होते, अशी त्यांची तक्रार असते. बायबल सांगते की, तुम्हाला पाप करण्यासाठी चिथवणाऱ्यांच्या शरीराला मोठा दगड बांधून त्यांना समुद्रात बुडवले पाहिजे. महिला पुरुषांना पापासाठी चिथवत असतील तर त्या पापी आहेत.