तिरुवनंतरपुरम - केरळच्या गृहमंत्र्यांना सॅल्यूट न केल्या प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांना राज्य सरकारने नोटीस बजवाली आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गृहमंत्री रमेश चेनिनथला यांचे आगमन झाल्यानंतर आयपीएस अधिकारी सिंह जागेवरुन उठले नाही आणि त्यांनी गृहमंत्र्यांना सॅल्यूटही केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ओमेन चांडी यांच्या आदेशावरुन ऋषिराज सिंह यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. विशेष म्हणजे ऋषिराज सिहं हे कायम चर्चेत असतात. ते कधी लुंगीवर स्टिंग करतात, तर कधी सहकारी आयपीएसच्या घरी रेड टाकण्यामुळे चर्चेत आलेले आहेत.
काय आहे प्रकरण
त्रिसूर येथे 11 जुलै रोजी महिला पोलिस पासिंग परेड झाली. या कार्यक्रमात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एडीजीपी ऋषिराज सिंह देखील उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री रमेश यांचे आगमन झाल्यानतंर सर्व पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्यांना सॅल्यूट केला, मात्र ऋषिराज आपल्या जागेवर बसून होते. एडीजीपी सिंह यांनी जाणूनबुजून असे केल्याचा नंतर आरोप करण्यात आला. मंचावरील हे दृष्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या एका कार्यक्रमात सिंह यांनी गृहमंत्र्यांना सॅल्यूट केला नाही तर, हात जोडून त्यांचे स्वागत केले.
सिंह यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर माध्यमांनी गृहमंत्री रमेश यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा त्यांनी, मी कोणतीही तक्रार केली नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः नोटीस बजावली असल्याचे सांगितले.
ऋषिराज सिंह यांचे स्पष्टीकरण
कारणे दाखवा नोटीसीनंतर आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह म्हणाले, मंत्री महोदय मागच्या बाजूने आले, त्यामुळे मी त्यांना पाहिले नव्हते. दुसरे असे की, कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलप्रमाणे परेड पाहाण्यासाठी गॅलरी मध्ये बसलेल्यांना राष्ट्रगीत सुरु होईपर्यंत उठण्याची परवानगी नव्हती. आम्हाला सांगण्यात आले होते, की व्हीआयपी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या जागेवरुन उठायचे नाही.
कोण आहेत ऋषिराज
ऋषिराज सिंह हे मुळचे राजस्थानमधील बिकानेर येथील आहेत. 1985 च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक अभिनव उपाययोजना केल्या आहेत. त्यांची माध्यमांमध्येही चांगली चर्चा झालेली आहे.
लुंगी घालून केले होते स्टिंग
ऋषिराज सिंह 2004 मध्ये आयजी (इंचार्ज ऑफ ट्रॅफिक) असताना त्यांना हायवेवरील ट्रॅफिक पोलिसांकडून वाहन चालकांची लुबाडणूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे हे रॅकेट पकडण्यासाठी त्यांनी वेषांतर केले. लुंगी घालून ते ट्रक ड्रायव्हरच्या शेजारी बसले. ट्रॅफिक पोलिसाने पैसे घेण्यासाठी हात पुढे करताच त्यांनी त्याचा हात पकडला होता. अशा पद्धतीने त्यांनी पोलिसांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता.
पुढील स्लाइडमध्ये, कार्यक्रमातील फोटो