आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Khap Panchayat Will Be Set Up National Committee To Provent Honour Killing

खाप पंचायती ऑनर किलिंग रोखण्‍यासाठी स्थापन करणार राष्‍ट्रीय समिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महम (रोहतक) - खाप पंचायतीच्या वतीने प्रथमच ऑनर किलिंगच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू करण्यात आली आहे. महम येथे सुरू असलेल्या या चर्चेत ऑनर किलिंगच्या मुद्द्यावर सर्व खाप पंचायती एकत्र आल्या असून त्यांनी कुटुंबांमध्ये संस्कारांविषयीची अनास्था आणि आधुनिकता यासाठी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याच वेळी ऑनर किलिंग रोखण्यासाठी राष्ट्रीय सर्वखाप समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.


ही राष्ट्रीय समिती गावोगावी जाऊन समाजामध्ये जागरूकता निर्माण करेल. सर्वखाप महापंचायतीच्या प्रतिनिधींच्या वतीने लवकरच आराखडा तयार करून या समितीची स्थापना केली जाणार आहे. रोहतक येथील महम येथे चौबीसी सर्वखाप पंचायतीमध्ये यासह अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय सर्वखाप महापंचायतीच्या अध्यक्षस्थानी तुलसी ग्रेवाल यांची निवड करण्यात आली.
यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. देशभरातून आलेल्या एकूण 140 खाप पंचायतींच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.


खाप पंचायतीही हिंसेच्या समर्थक नसल्याचे या वेळी अध्यक्ष ग्रेवाल यांनी सांगितले. पण समुपदेशनाच्या मार्गाने तरुणांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणल्यानंतरच ऑनर किलिंगवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचेही ते या वेळी बोलताना म्हणाले. एकाच गोत्रामध्ये विवाह केल्यास थायलिसेमियासारखे भयंकर रोग जडण्याची शक्यता असते. ते रोखण्यासाठीही हे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.


चौबीसी येथील ऐतिहासिक चौथ-यावर या सर्वखाप महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी प्रथमच महिलांनीही ऑनर किलिंगसारख्या सामाजिक मुद्यावर आपली मते मांडली. सहभागी झालेल्या महिलांची संख्या अवघी दहाच्या घरात असली, तरीही एक चांगली सुरुवात म्हणून या पावलाचे कौतुक करण्यात आले.