आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८,३२९ फूट उंच, १४०० किमी अंतर, १४ दिवसांचा खडतर प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेह - खरदुंगला टॉप. गाड्या जाऊ शकतील अशी जगातील सर्वात उंच खिंड. समुद्रसपाटीपासून १८,३२९ फूट उंच. प्रवासात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्याने वाटले थोडेसे थांबावे. चालक अलीकडे तशी विनंती केली तर त्याच्याकडून नकार आला. त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो तर समोर रस्त्यावर मोठमोठे दगड कोसळताना दिसले. काही कळण्याच्या आत अली म्हणाला, वाचलाे हेच नशीब. अखेर अलीला थांबावे लागले. उंच पर्वतावरील सौंदर्य जेवढे लोभस तेवढेच ते धोकादायक असल्याचे कळाले. प्रवासादरम्यान पहिल्यांदाच मृत्यूसदृश स्थितीची जाणीव झाली.

अशा परिस्थितीतही आम्ही पुढे जाऊ लागलो. लेह-मनाली रस्त्यावर ३६ वर्षांनंतर विक्रमी बर्फवृष्टी झाली. हिमस्खलनाची शक्यता १० पटीने वाढली. त्यामुळे आतापर्यंत हा रस्ता खुला झाला नाही. सर्वात रोमांचक प्रवास सर्वात धोकादायक स्थितीत झाला तर कसे वाटेल? आणि हा अनुभव सर्वात आधी घेण्याचा निश्चय करत भास्कर टीमच्या आम्ही तिघांनी वाट धरली. १४०० किमीचा १४ दिवसांच्या प्रवासाची सुरुवात श्रीनगरहून झाली. एक जीप, एक मोटारसायकल आणि दोन मदतनीस अली आणि रमजान यांची सोबत होती. एकूण प्रवासात आठ दिवस जाण्यासाठी आणि आठ दिवस येण्यासाठी लागले.

६ जूनला पहाटे निघालो. दुपारपर्यंत सोनमर्गचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळत प्रश्न पडला की, दरवर्षी एक लाख ८७ हजार पर्यटक या रस्त्यावर जाण्याची जोखीम का उचलत असावेत? सूर्यकिरणांनी हिमनगांना सोन्याची झळाळी प्राप्त झाली होती. हिमनगाला धडकून आलेली हवा ताजेतवाने करत होती. पुढच्या आव्हानांचा विचार न करता या वातारणाचा सुखद अनुभव घेतला. काही वेळानंतर पोलिस आणि सीमा रस्ते संघटनेचा संयुक्त तपास नाका आला. इथे प्रवाशांची संख्या विचारण्यात आली. याची गरज काय असे वाटले, त्यावर उत्तर मिळाले- काेणी मेले-बिले तर कोण होते किती जण होते आदींची माहिती असावी म्हणून. औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आम्ही पुढे निघालो. आता आम्ही जोजिला खिंडीत होतो. १० किमी गेलो हाेतो. साधारण १.३० वाजता अचानक बर्फवृष्टी सुरू झाली. मात्र, आम्ही थांबलो नाही. बर्फवृष्टीसोबत पर्वतावर दगड निसटण्यास सुरुवात झाली होती. आम्ही अंतर कापत होतो, वाटेत कोणाच्याही तोंडून शब्द निघत नव्हता. यानंतर अली म्हणाला, काय झाले साहेब, तुम्ही तर आतापासून शांत झालात. उंचावरील नागमोडी वळणाच्या रस्त्यामुळे डोके जड पडल्याचे जाणवले.

आम्ही द्रासपासून ५० किमी लांब होतो. समुद्रसपाटीपासून ११ हजार ५७५ फूट उंचीवर. येथून गाड्या एकत्र पाठवल्या जातात. जोजिला खिंडीचा ९ किमी रस्ता पार करण्यास आम्हाला अडीच तास लागले. द्रास सुरू होताच रस्त्यावर काही ठिकाणी भिंत उभी असल्याचे दिसले. एक अधिकारी याबाबत म्हणाला, कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैनिकांची नजर या रस्त्यापर्यंत राहत होती. त्यांना वाहन दिसू नये यासाठी रस्त्याच्या कडेला भिंत बांधण्यात आली. द्रासनंतर येते कारगिल. छोटेसे गाव, तिथेच आम्हाला रात्र काढावयाची होती.१९९९ चे युद्ध या भागाच्या नावाने ओळखले जात असले तरी त्याच्या खाणाखुणा कुठेही दिसत नाहीत. इथपर्यंतचा प्रवास ठिकठाक राहिला. सातपैकी पहिली खिंड जोजिला आम्ही पार केली होती. आता आम्हाला लेहला जायचे होते.

७ जूनचा प्रवास आरामदायक झाला. डोळे तृप्त करणार्‍या पर्वत शिखरांच्या सौंदर्यामुळे कालचा थकवा निघून गेला. रात्री आठपर्यंत आम्ही लेह गाठले.

८ जून रोजी इथेच थांबण्याचे नियोजन होते. शरीर स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ते आवश्यक होते.
९ जून रोजी सकाळी ७.०० वाजता आम्ही पुढे निघालो. १० किमीच्या प्रवासानंतर निळ्या आकाशातून हळुवार झेपावणारे ढग स्वर्गानुभूती देत होते. मात्र, नऊ महिने कोसळणार्‍या बर्फामुळे रस्त्यावर चालताही येत नाही. मात्र, ऊन आणि अलीच्या सहकार्यामुळे सर्वकाही व्यवस्थित चालत होते. दरीमध्ये एकटीदुकटी घरे दिसत होती. अधूनमधून दृष्टीआड जाणार्‍या रस्त्यावरचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटक इथे का येतात याचे कोडे उमगले. कुठला मोठा धोका दृष्टिक्षेपात नव्हता तेव्हा अलीला विचारले, खूप जोखीम आहे,असे वाटले नाही. त्यावर त्याचे उत्तर होते, तीन गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही. एक वातावरण, दोन रस्ता आणि तीन मशीन. प्रश्नार्थक चेहरा केल्यानंतर थोडे पुढे चला म्हणजे कळेल एवढेच म्हणाला. यादरम्यान आम्ही खोर्‍यातून उपसीकडे मार्गक्रमण केले.

संकटाशी सामना कधीही होऊ शकतो : यादरम्यान आम्ही घाट सोडून उपसीच्या दिशेने जाऊ लागलो. एक पर्वत ओलांडून दुसर्‍या दिशेने जात होतो तेव्हा बर्फवृष्टी सुरू झाली. १५ अंश सेल्सियस तापमान तीन अंशावर आले. कडाक्याच्या थंडीत जॅकेट घातले तरी अंग थरथरत होते. बाइक चालवणारे हात सुजले होते. अ‍ॅक्सिलेटर वाढवल्यावरही बाइक स्पीड पकडत नव्हती. वळणावर बाइक मागे घसरते की काय असे वाटत होते. प्रवासाचा रोमांचक अनुभव आता भीतीत रूपांतरित होत होता. दोन किमी चालल्यानंतर बाजूला आणखी एक १०० फूट उंच बर्फाचा पर्वत आणि दुसरीकडे पाेटात भीतीचा गोळा आणणारी दरी.

खाली पाहिले तर शेवटपर्यंत काहीही दिसत नाही. वेग केवळ १० किमी प्रतितास होता. क्लच दाबून मशीनची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला, तर मोटारसायकल बंद पडेल की काय असे वाटले. त्याचवेळी अलीने आठवण करून दिली, मशीन कधीही धोका देऊ शकेल,असे म्हटले होते ना? उंचीवर ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे इंधन पूर्णपणे जळत नव्हते. यामुळे वाहनाला वेग येत नव्हता. हे दुर्घटनेचे कारण ठरते. आम्ही उपसी आणि गोया पार करून १७,४८० फूट उंचीवरील टांगलांगला पोहोचलो. यानंतर पुढे जाताना हिमकडे कोसळल्याने रस्ता दिसेनासा झाला. सीमा रस्ते संघटनेकडे (बीआरओ) स्नो कटर होते. त्यांच्याकडे मदत मागितल्यावर त्यंानी रस्ता साफ करून दिला. अलीच्या सांगण्यावरून आम्ही गाडीच्या टायरला बर्फावर चालणारी चेन बांधली. यामुळे बर्फावरून गाडी घसरत नाही. मोटारसायकलही याच रस्त्यावरून येत राहिली. संपूर्ण दिवसभरात २६० किमी प्रवास केल्यानंतर रात्री नऊ वाजता आम्ही सरचू पोहोचलो. येथील उंची १५,१०० फूट आहे. हे लेहचे शेवटचे टोक आहे. येथून हिमाचल प्रदेशची सीमा सुरू होते. प्रवासाचे चार दिवस झाले.

१० जून : रस्ता सुरू नसल्याने पुढे जाऊ शकलो नाही. बीआरओ मनालीचे मेजर आर.अजित यांनी थोडी वाट पाहण्यास सांगितले. बर्फाने ३६ वर्षांचा विक्रम मोडला होता. रस्त्यावर १० फूट ते ७० फूट बर्फ जमा झाला. अडकल्यास मदत मिळणार नव्हती. खिंडीतून जाण्याची जोखीम २० पट जास्त झाली. येथून परत येण्याचा एकच मार्ग राहतो.

११ जूनच्या रात्रीपर्यंत लेह पोहोचलेा आणि पुन्हा सर्वात उंच खरदुंगला खिंड ओलांडण्याचे ठरले.
१२ जून रोजी गाडी लेहमध्ये सोडली. दोन मदतनिसांनी निरोप घेतला. आणखी एक मोटारसायकल किरायाने घेतली आणि खरदुंगलाच्या दिशेने कूच केली. खरदुंगलापासून लेह ३८ किमी अंतरावर आहे. मात्र, पोहोचण्यासाठी पाच तास लागले. ऑक्सिजन स्तर कमी असल्यामुळे दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ न थांबण्याचा सल्ला लष्कराचे इन्चार्ज कुलदीप सिंह यांनी दिला. १० मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास स्मरणशक्ती नष्ट होऊ शकते. उंचावर जाताना धाप लागत असेल असा काहींचा समज असतो. ऑक्सिजन कमी झाल्याचे ते लक्षण आहे. अशावेळी कृत्रिम श्वासोच्छवास घेतला जावा. दररोज २५ रुग्णांना ऑक्सिजन देत असल्याचे कुलदीप यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...