अलवर - हरियाणात सुनेनेच तीन कोटींच्या मालमत्तेसाठी सासू, सासरा आणि दिरास ठार मारले. त्यानंतर मृतदेह राजस्थानातील अलवर येथे नेऊन गोवऱ्याच्या ढिगात लपवून पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकले. हे कृत्य गीता नावाच्या महिलेने तिचा भाऊ व इतर दोघांच्या साह्याने केले. पोलिसांनी सोहना शहरात राहणाऱ्या गीता व अन्य एकास अटक केली आहे.
अलवरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक पारस जैन यांनी सांगितले, ढिगाखाली मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी माहिती गोळा केली आहे. तेव्हा समजले की, हरियाणाचा क्रमांक असलेली एक कार गावाजवळ दिसली. पोलिसांनी सोहना येथील कारमालक शुभम राघव याचा पत्ता शोधला. त्याने सांगितले, शेजारी राहणाऱ्या गीताचा भाऊ समरदीपने माझी कार मागून नेली होती. पोलिस समरदीपच्या घरी गेले. तेव्हा तेथे गीता दिसली. तिची चौकशी केली असता, गीताचे सासरे, सत्यपाल, सासू पुष्पा व दीर पंकज तोमर २८ सप्टेंबरपासून घरातून गायब झाले आहेत. या तिघांबाबत विचारणा केली तेव्हा गीता गोंधळली. पोलिसांनी खाक्या दाखवताच भाऊ समरदीप, चुलत सासू व सासऱ्याचा नोकर विकासच्या मदतीने गुरुवारी सासरा, सासू व दिराचा गळा दाबून खून केला. मृतदेह प्लास्टिकच्या थैलीत काेंबले. भावाने त्याचा मित्र शुभमची कार आणली. दीर पंकजचा मृतदेह नगिना पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेकला. त्यावर पेट्रोल टाकून तो जाळून टाकला. त्यानंतर तेे राजस्थानातील चंदिगड अहिर गावी गेेले. तेथे रस्त्याच्या कडेला असलेल्या गोवऱ्याच्या ढिगात सासू व सासऱ्याचा मृतदेह लपवले. त्यावर पेट्रोल टाकून आग लावली आणि सोहनाला परतले.
सात महिन्यांपूर्वी गीताच्या नवऱ्याची आत्महत्या
गीताचा पती विपिन याने ५ मार्च २०१७ रोजी फाशी घेऊन आत्महत्या केली होती. सासऱ्याकडे ८ कोटी रुपयांची मालमत्ता होती. ते वाटणीस तयार नव्हते. गीताने त्यापैकी ३ कोटींच्या मालमत्तेवर हक्क सांगितला. यावरून सासऱ्याशी वाद झाले. पतीच्या आत्महत्येस तिने सासू, सासऱ्यास जबाबदार धरलेे. यामुळेच गीताने भावाच्या संगनमताने सासू व सासऱ्याची तसेच दिराची हत्या केली.
निवृत्त जवानाचे कुटुंबच उद््ध्वस्त
निवृत्त जवान सत्यपालच्या कुटुंबात त्याची पत्नी, एक मुलगी व दोन मुले पंकज आणि विपिन असा परिवार होता. सत्यपालने तिन्ही मुलांची लग्ने लावून दिली. मोठा मुलगा पंकजला ८ वर्षांपूर्वी अपघात झाला. त्यात तो अपंग झाला. त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला होता. विपिनचे गीताशी लग्न झाले. गीताला एक मुलगी आहे. सात महिन्यांपूर्वी विपिनचेही वडिलांशी मालमत्तेच्या वाटणीवरून वाद झाले. त्यानंतर विपिनने आत्महत्या केली. गीता मुलगी चिंकीसह सासऱ्याच्या घरी वरच्या मजल्यावर राहत होती.