आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दस्तऐवज आणण्यासाठी समितीची स्थापना करा, नेताजींंच्या नातेवाइकांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंबंधीच्या गोपनीय फायली परदेशातून आणण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी त्यात लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी बोस यांच्या नातेवाइकांनी केली आहे.

नेताजींच्या पुतण्याचा मुलगा व भाजप नेते चंद्र बोस यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी समिती स्थापन करण्यात यायला हवी. त्यात पंतप्रधान कार्यालय, गृह विभाग, गुप्तहेर, पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असावा. समितीने रशिया, लंडन, बर्लिन, टोकियो तसेच चीनलादेखील जाणे आवश्यक आहे. त्या ठिकाणाहून हेरगिरी पातळीवरील माहिती असलेल्या फायली मिळवल्या पाहिजेत; जेणेकरून एकूण घटनाक्रमाचा अन्वयार्थ लावणे शक्य होईल. अन्यथा ते केवळ अशक्य असल्याचा दावा चंद्र बोस यांनी केला आहे. दरम्यान, सरकारने २००-२५० दस्तऐवज जाहीर केले आहेत.

अजूनही सरकारच्या ताब्यात ४००-५०० फायली आहेत. केंद्र सरकार दर महिन्याला २५ फायली जाहीर करते.

हेरांच्या गुप्त संकेतांची उकल महत्त्वाची
हेरगिरीमध्ये गुप्त संकेतांचा वापर केला जातो. देशोदेशीच्या तत्कालीन संकेतांचा अर्थ आेळखण्याचे काम काही इतिहासतज्ज्ञ करू शकत नाहीत. त्यासाठी इतर विभागांतील तज्ज्ञांचीदेखील मदत घ्यावी लागेल. त्यानंतर हेरगिरीतील संकेतांची योग्य प्रकारे उकल होऊन ऐतिहासिक घटनांचा क्रम जुळवता येऊ शकेल. त्यानंतरच सत्य समोर येईल, असे चंद्र बोस यांचे म्हणणे आहे.
तार्किक निष्कर्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या मृत्यूबाबतच्या गूढतेचा गुंता दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु आता तार्किक निष्कर्षाची आम्हाला अपेक्षा आहे. मात्र त्यासाठी निश्चित कालावधी असला पाहिजे. चंद्र बोस व अनुज धर यांनी ही मागणी केली आहे. नेताजींच्या मृत्यूबद्दलचे गोपनीय दस्तऐवज जाहीर करण्यासाठी धर यांनी आग्रह धरला होता.
बातम्या आणखी आहेत...