आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kiran Reddy Resigns As AP CM; Also Quits Congress, Latest News

मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसला किरणकुमार रेड्डींचे ‘विडकोलू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद-स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीच्या निषेधार्थ किरणकुमार रेड्डी यांनी अखेर आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.रेड्डींच्या राजीनाम्यामुळे सीमांध्र आणि रायलसीमा भागात सत्ताधारी काँग्रेसला झटका बसला आहे. रेड्डी नवा पक्ष स्थापणार असल्याचे सांगितले जाते परंतु मंगळवारी त्यांनी त्याबद्दल मौन बाळगणेच पसंत केले. दरम्यान,रेड्डींच्या राजीनाम्यानंतर आंध्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
तेलंगण विधेयक विधानसभेत फेटाळून रेड्डी यांनी आंध्र विभाजन टाळण्याचे आटोकाट प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले.मंगळवारी राज्यपाल ईएसएल नरसिंम्हन यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला.रेड्डींनी काँग्रेस व आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.53 वर्षीय रेड्डी नवा पक्ष स्थापन करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याविषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.माझा पक्ष अथवा भवितव्य महत्त्वाचे नाही.आंध्र प्रदेशला एकत्रित ठेवण्यासाठी माझी लढाई आहे.विभाजन करून काँग्रेसने तेलगू जनतेच्या भावना दुखावल्या असून जनतेचे हाल होणार आहेत असे रेड्डी म्हणाले.
सीमांध्रातील 13 जिल्ह्यात कडकडीत बंद
लोकसभेत तेलंगण विधेयक पारित झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी आंध्र प्रदेशच्या सीमांध्र भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून सर्वत्र कडक बंदोबस्त तैनात केला होता. वायएसआर कॉँग्रेस, तेलगू देसम आणि अन्य संघटनांनी बंदची हाक दिली होती. रायलसीमा आणि आंध्र किनारपट्टी क्षेत्रात तुरळक प्रतिसाद मिळाला. अखंड आंध्र समर्थकांनी विशाखापट्टणम, श्रीकाकुलम, विजयनगरम, कृष्णा, गुंटूर, प्रकासम, तिरुपती, नेल्लोर, अनंतपूर, कर्नुल, कडप्पा, चित्तूर, पूर्व व पश्चिम गोदावरी जिल्ह्यासह अन्य भागांत मोर्चा, मानवी साखळी उभारून निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. सीमांध्रमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त 25 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.