आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिजीजूंचे सॉरी, फडणवीसांची ना, भाजप मंत्र्यांच्या दोन तऱ्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / नवी दिल्ली -भाजपच्या मंत्र्यांमागील वादाचे शुक्लकाष्ठ सुटण्याची चिन्हे दिसेनाशी आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांच्यासाठी विमानातून तीन प्रवाशांना उतरवून विमानाला विलंब केल्याचे प्रकरण तापले असून रिजीजू यांनी माफीही मागितली आहे. मात्र अमेरिका दौऱ्यावर जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एअर इंडियाच्या विमानाला ५७ मिनिटे उशीर केल्याचे ड्युटी ऑफिसरच्या अहवालातून स्पष्ट झाले असले तरी फडणवीस इन्कारावर ठाम आहेत.
दरम्यान, व्हीव्हीआयपींसाठी विमान प्रवाशांची गैरसोय झाल्याच्या या दोन्ही घटनांचा पंतप्रधान कार्यालयाने नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अहवाल मागितला आहे. २४ जून रोजी लेह विमानतळावर केंद्रीय गृहराज्य मंत्री किरण रिजीजू यांना एअर इंडियाच्या विमानात जागा देण्यासाठी तीन प्रवाशांना उतरवण्यात आले होते. त्यात एका मुलाचाही समावेश होता. त्यामुळे विमानाला तब्बल ५७ मिनिटे उशीर झाला. या घटनेचा व्हिडीओ लिक झाल्यानंतर रिजीजू यांनी माफी मागितली आहे.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आपल्यामुळे विमानाला उशीर झालाच नसल्याच्या दाव्यावर ठाम आहेत. २९ जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जाताना त्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हे अमेरिकेचा वैध व्हिसा असलेला पासपोर्ट घरीच विसरले होते. त्यामुळे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना विमानात प्रवेश नाकारला होता. आपण शिष्टमंडळाशिवाय जाऊच शकत नाही, अशी भूमिका घेत फडणवीसांनी भूमिका घेतल्यामुळे परदेशींचा जुना पासपोर्ट आणून त्याची तपासणी होईपर्यंत विमान थांबवावे लागले. फडणवीसांचे लगेज उतरवायचे झाल्यास जास्त वेळ गेला असता म्हणून विमान थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विमानाला ५७ मिनिटे विलंब झाला.असे ड्युटी ऑफिसरच्या अहवालातून स्पष्ट झाले. तरी मुख्यमंत्र्यांना अहवालातील या नोंदीही मान्य नाहीत. आपण विमानात एक शब्दही न बोलता शांत बसलो होतो. त्याला माझ्या आजूबाजूला बसलेले प्रवाशी साक्षीदार आहेत, असे ट्विट मुख्यमंत्री फडणवीसांनी केले आहे.
गैरसोयीबद्दल क्षमस्व
मंत्री या नात्याने आमच्यामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही, हे पाहणे आमची नैतिक जबाबदारी आहे. सरकारच्या वतीने या घटनेबद्दल मी माफी मागतो.
- रिजीजू, केंद्रीय गृह राज्यमंत्री
बदनामीचा खटला भरीन
मी एक शब्दही न बोलता शांत बसून होतो. माझ्यामुळे विलंब झाल्याचे वृत्त खोटे आहे. आता बस्स झाले. भारतात परतल्यावर मी बदनामीचा खटला दाखल करीन.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री (ट्विट)