आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How Love Letters, Phone Calls To Pakistan Landed UP Man In Jail

पाकिस्तानी प्रेयसीच्या नादात घालवली 11 वर्षे तुरुंगात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामपूर (उत्तर प्रदेश) - पाकिस्तानमधील प्रेयसीला वारंवार पत्रे लिहिल्यामुळे आणि दूरध्वनी केल्यामुळे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका प्रियकराला तब्बल अकरा वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली.

रामपूर जिल्ह्यातील 32 वर्षीय जावेद पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानात गेला होता. त्या वेळी कराचीमधील मोबिनाबरोबर त्याची ओळख झाली होती. जावेद भारतात परतल्यानंतर मोबिनाला दूरध्वनी करू लागला. पुढे दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. जावेद दिवसातून दोन- तीन वेळा दूरध्वनी करून तिच्याशी संवाद साधत असे. पुढे दोघांचा पत्रव्यवहारही सुरू झाला. जावेदला लिहिता- वाचता येत नसल्यामुळे तो मोबिनाने पाठवलेली उर्दू पत्रे मित्रांकडून वाचून घेत असे. त्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा परिसरामध्ये होऊ लागली होती. पाकिस्तानातील दूरध्वनी व पत्रव्यवहारामुळे जावेद पुढे पोलिसांच्या ‘हिट लिस्ट’वर आला.

‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेचा एजंट असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला 2002 मध्ये अटक केली. जावेदने न्यायालयामध्ये आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु पुरावे न देऊ शकल्यामुळे त्याला तुरुंगातच राहावे लागले. पोलिसांनी आयएसआयचा एजंट ठरवून तुरूंगात डांबलेल्या जावेदची 19 जानेवारी 2014 रोजी अखेर न्यायालयाने पुराव्याअभावी सुटका केली. परंतु सीमेपलिकडच्या प्रेमासाठी त्याला तब्बल अकरा वर्षे तुरुंगातच काढावी लागली.