आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पणजी - गोवा सरकार वर्षानुवर्षे कोल्हापूरमधील बाजारपेठेतून गाय खरेदी करत आले आहे, परंतु यंदा गोव्याने महाराष्ट्राला पाठ दाखवून तामिळनाडूकडे मोर्चा वळवला आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील पारंपरिक बाजारपेठेवर होणार असल्याचे मानले जाते.
कोल्हापूरमध्ये जनावरांची मोठी पारंपरिक बाजारपेठ आहे. त्याचबरोबर दूध उत्पादन आणि सहकारावर आधारित उद्योगही मोठ्या प्रमाणात आहे. डेअरी व्यवसाय करणा-या शेतक-यांसाठी अनुदानातून देण्यात येणा-या योजनेअंतर्गत ही खरेदी केली जात होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून गोवा सरकारने तमिळनाडूतील इरोडे जिल्ह्यातून गाय खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरमधून गोव्यात आणण्यात आलेल्या गाईंना येथील हवामान मानवत नसल्याचे दिसून आले आहे. या गाई येथील वातावरण तग धरण्यात अयशस्वी ठरू लागल्या आहेत. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर झाल्याचा दावा एका वरिष्ठ अधिका-याने केला.
आणखी काय आहेत कारणे ?
गाय खरेदीसाठी बाजारपेठ बदलण्यामागे काही कारणे असल्याचे गोवा सरकारच्या अधिका-यांनी सांगितले. गोव्याप्रमाणेच इरोडे जिल्ह्यातील वातावरण आहे. त्याशिवाय डेअरी व्यवसाय करणा-या शेतक-यांना गाय खरेदीसाठी लागणा-या सरकारी प्रक्रियाही सहज आहे. सरकारी फायदेदेखील अधिक आहेत, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.
1,354 गाईंची खरेदी इरोडेमधून करण्यात आली.
35 ते 58 हजार रुपयात गाईची खरेदी केली जाते.
गाई थेट शेतात
गोव्यात मार्चमध्ये सत्तेवर आलेल्या पर्रीकर सरकारने कामधेनू योजनेचे पुनरुज्जीवन केले आहे. आतापर्यंत योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला होता. कोल्हापूरमधून गाई आणल्याचे केवळ कागदोपत्री दाखवण्यात यायचे. प्रत्यक्षात मात्र मोजक्याच गाई राज्यात येत. त्यामुळे सरकारने नोव्हेंबरमध्ये कोल्हापूरऐवजी इरोडेमधून खरेदीचा निर्णय घेतला. इरोडे ते गोवा हे 859 किलोमीटरचे अंतर आहे. कंत्राटदाराला खरेदी केलेल्या गाई थेट दूध उत्पादक शेतक-यांच्या शेतात नेऊन द्याव्या लागणार आहेत. त्याच अटीवर हा करार करण्यात आला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.