दुर्गा पूजा म्हटली की, ‘सिटी ऑफ जॉय’ कोलकात्याशिवाय पुढे जाताच येत नाही. नवरात्रीचे नऊ दिवस येथे सर्व काही बदलते. यादरम्यान देवी कालीची दुर्गारूपात पूजा होते. लोक वर्षभर त्या दिवसाची प्रतीक्षा करतात. देश-विदेशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहणारा, जर तो कोलकात्यात जन्मलेला असेल, तर दुर्गा पूजेत सहभागी होण्यास निश्चितच येथे येतो.
बंगालमध्ये पूजेचा अर्थ फक्त देवीचे स्मरण करणे असा होत नाही, तर संपूर्ण वर्षाचे दु:ख विसरून आनंद साजरा करण्याचा उत्सव आहे. दोन महिने आधीपासूनच दुर्गा पूजेची तयारी सुरू होते. कोलकात्याच्या प्रत्येक कोपऱ्यात, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत.. नाकतला ते बेहाला, बाग बाजार, श्याम बाजार यांसारखा प्रत्येक मोहल्ला, बाजार, चौक किंवा गल्लीत एक भव्य मंडप असतो. अनेक मंडप तयार आहेत, तर काही अजूनही सजत आहेत. पंचमीच्या पूजेनंतर येथे वातावरण निर्मिती होते. सकाळपासून रात्रीपर्यंत देवी दर्शन आणि मंडप भ्रमण सुरू राहते. गंगा नदीच्या तटावरील काली मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी होते. दिवसाच्या पूजेनंतर दुपारी देवीला विशेष नैवेद्य दाखवला.
बकऱ्याचे मांस, मासे, तांदूळ, पुलाव, सुक्ता, ५ भाज्यांची भाजी, खीर, चटणी आणि मिठाई त्यात होती. त्यानंतर तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. दसऱ्याच्या दिवशी काली मंदिरात महिलांचा ‘सिंदूर खेला’ होतो. तो पाहण्यासाठी लोक शेजारच्या राज्यांतूनही येतात. विवाहित महिला लाल साडी परिधान करून कपाळावर कुंकू लावून मंडपामध्ये येतात आणि देवीला निरोप देतात. एकमेकींना गुलाल लावतात आणि सिंदूर खेला खेळतात.
यादरम्यान महिला भाविकांची गर्दी वाढल्याने पुरुषांना प्रवेश दिला जात नाही. बंगालमध्ये कुमारी पूजा प्रचलित आहे. घरा, गल्लीत लोक कुमारिकांची पूजा करतात. नवरात्रीचे ९ दिवस कुमारी पूजा होते. कुमारिकांना देवीप्रमाणे पुजले जाते. विशेष म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी बेलूर मठात ही प्रथा सुरू केली होती.