आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kosi Floods: Bihar Govt Orders Evacuation Of 1.5 Lakh

नेपाळ भूस्खलनाचा परिणाम : बिहारमध्ये हाय अलर्ट, कोसी नदीची जलपातळी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमधील चार जिल्ह्यांत रविवारी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नेपाळमधील भूस्खलनामुळे कोसी नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाल्यामुळे राज्यातील नदीकाठच्या चार जिल्ह्यांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नेपाळमधून सुसाट सुटलेल्या प्रवाहाचे 40 टक्के पाणी बिहारमध्ये घुसल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

नेपाळमध्ये सिंधुपालचोक जिल्ह्यात कोसी नदीच्या काठावर बंधार्‍यालगत खोदकाम केल्यामुळे अचानक भूस्खलन झाले आणि नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली, असे बिहारचे जलसंवर्धन मंत्री विजयकुमार चौधरी यांनी सांगितले. भूस्खलनामुळे नदीत 10 मीटर उंचीपर्यंत पाण्याचा प्रवाह असणार आहे. त्यामुळे सुपौल, सहारसा, मधेपुरा, मधुबनी , खागरिया, भागलपूर, अररिया, पुर्णिया या आठ जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाल्याचे बिहार आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. नदीकाठच्या आठ जिल्ह्यांतील नागरिकांना तत्काळ गावे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. तत्पूर्वीच शनिवारी सरकारने दक्षतेचा इशारा दिला होता. त्यामुळे लष्कराने सुपौल, सहारसा, मधेपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या स्थलांतर आणि मदतीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली. एनडीआरएफच्या सात तुकड्यादेखील तीन जिल्ह्यांत दाखल झाल्या आहेत. कोलकात्याहून या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.

2008 मध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू
नेपाळच्या कुशाहा येथील बंधार्‍याला भगदाड पडल्यामुळे 2008 मध्ये बिहारमध्ये मोठी प्राणहानी झाली होती. बंधार्‍याचे पाणी मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये दाखल झाल्यानंतर कोसी नदीचा प्रवाहच बदलला होता. त्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. 30 लाख लोकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली होती. त्यात 8 लाख एकरांवरील शेतीचेही मोठे नुकसान झाले होते.

25 लाख क्युसेक विसर्ग
बिहारमधील नदीच्या भागात 25 लाख क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने जलपातळीत वाढ झाली आहे. 10 मीटर उंच अजस्र लाटांचे पाणी आल्याने प्रशासन हादरले आहे. नेपाळमधील भारतीय अधिकारीदेखील भोटे कोसी या बंधार्‍याच्या स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहेत.

दीड लाख स्थलांतरित
कोसी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने बिहारमधील सुमारे 20 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सुमारे दीड लाख नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

बिरपूर धरण
बिरपूर धरणाचे सर्व 56 दरवाजे उघडण्यात येणार आहेत. नेपाळमधून आलेल्या पाण्याच्या प्रवाहाला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. धरणाची क्षमता 8 लाख क्युसेक आहे.

84 मदत केंदे्र
सरकारने 84 ठिकाणी मदत केंदे्र उभारली आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आठ एनडीआरएफ आणि चार एसडीआरएफची पथके रवाना करण्यात आली आहेत.

राजनाथसिंह-जितनराम मांझी चर्चा
कोसी नदीवर नेपाळने कृत्रिम धरण बांधले आहे. त्यातूनच ही भूस्खलनाची घटना घडली आहे. त्यातून मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी बिहारला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन केंद्राने दिले आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्याशी चर्चा केली.