आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक कुटुंब, सहा सदस्य, ५० वर शस्त्रक्रिया, हातापायाची ६-७ बोटे चिकटलेली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - एका कुटुंबात सहा सदस्य आणि त्यांच्यावर ५० हून अधिक शस्त्रक्रिया... राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील नोताडा भोपत गावातील हा विचित्र प्रकार सध्या चर्चेत आहे. कोटा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर एकामागे एक या शस्त्रक्रिया करत आहेत. आतापर्यंत दोन मुलांच्या एकेका हातावर प्रत्येकी ३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या एका सदस्यावर प्रत्येकी ६ ते १० शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. डॉक्टरांनुसार हा अत्यंत गंभीर व दुर्मिळ आजार असून लाखो लोकांत एखाद्यालाच तो होतो.

या कुटुंबात अानुवंशिक आजार आहे. पित्याला व मुलांच्या हाता-पायांना सहा ते सात बोटे आहेत. हाताची ३ ते ४ बोटे चिकटलेली आहेत. शिवाय अंगठा नाहीच. यामुळे मुलांना लिहिताना, वाचताना किंवा इतर कामे करताना अडचण येते. सूरजमल कुशवाह (३५) यांचे हे कुटुंब आहे. ते सांगतात, मला आणि भाऊ संजय याला जन्मत:च हात व पायाला ७-७ बाेटे आहेत. अंगठे जवळजवळ नाहीतच. ही बोटेही चिकटलेली आहेत. वडील गरीब असल्याने यावर उपचारही करता आला नाही. अंगठा आणि बोटे व्यवस्थित नसल्याने मी शिकू शकलो नाही. नंतर माझी मुले बंटी (१३), श्यामबिहारी (१०) आणि पुतण्या युवराज (१२) तसेच रवीना (८) यांच्या बाबतीतही हेच घडले. वर्षभरापूर्वी गावात वैद्यकीय शिबिर भरले होते. तेथे दाखवले तेव्हा डॉक्टरांनी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. प्लास्टिक सर्जन डॉ. रितेश जैन यांनी या प्रकारावर उपचार होऊ शकतो असे सांगितले. बोटे वेगळे केली जाऊ शकतील, पण यासाठी एकेकाला टप्प्याटप्प्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, असेही सांगितले. आता या सर्वांवर एकामागे एक शस्त्रक्रिया सुरू आहेत.

डॉ. रितेश जैन म्हणाले, पहिल्या टप्प्यात मुलांना दाखल करून घेतले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहेत. बंटी आणि शाम यांच्या एकेका हातावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पहिल्या शस्त्रक्रियेत चिकटलेली बोटे वेगळी केली. दुसऱ्या वेळी कमी विकसित बोटे काढून टाकली आणि तिसऱ्या टप्प्यात अंगठा तयार केला जात आहे. आता वायरचा वापर करून अंगठा तयार केला जात आहे. हेच मोठे आव्हान आहे. यासाठी हाड कापून त्याला आकार द्यावा लागणार आहे. प्रत्येक शस्त्रक्रियेत तीन-तीन महिन्यांचे अंतर ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयात सर्व उपचार मोफत असून रुग्णालयात जी औषधे मिळत नाहीत ती रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून आणावी लागतात.

दुर्मिळ आजार
या आजाराला ‘फॅमिलियल सिंडेक्टली विथ पॉलिडेक्टाइल’ असे म्हणतात. आईच्या गर्भात सर्वच मुलांच्या हाताची बोटे चिकटलेली असतात. नंतर ती आपोआप खुली होतात. मात्र, या आजारात मुलांची बोटे तशीच राहतात. पेशींचा विकास होत नसल्याने हे घडते. यामुळे अंगठ्याचाही विकास होऊ शकत नाही. यात बोटांची लांबी पण अधिक होते.
बातम्या आणखी आहेत...