आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचारानंतर हैवानांनी फेकले झुडपांत, ‘ती’च्या संघर्षाची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्याचार केल्यानंतर तीन जणांनी दुर्गाला (बदललेले नाव) झाडाझुडपांत फेकून दिले होते. पोलिसांना ती बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्यानंतर पालकांच्या उपेक्षेचा सामना केला. नातेवाइकांचे टोमणे सहन केले. परदेशातील चांगल्या नोकरीची संधी सोडली आणि स्वत:साठी नव्या आयुष्याचा शोध सुरू केला. या एक वर्षात ती अनेक रात्री झोपलीच नाही. अनेक दिवस अस्वस्थतेत गेले. पण आरोपींना शिक्षा होईपर्यंत तिने शांततेने श्वास घेतला नाही.

तामिळनाडूच्या या मुलीचे आयुष्य असे नव्हते, खूप आनंदी होते. हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केल्यानंतर दुर्गा एमबीए करत होती. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये नोकरी आणि शिक्षणासोबतच विदेशात करीअर करण्याची पूर्ण तयारी केली होती. नोकरी मिळाली, व्हिसाचीही तयारी झाली होती. पण एक वर्षापूर्वी तिचे आयुष्यच बदलले.तो दिवस आठवून ती सांगते की, हॉटेलची नाइट ड्युटी संपवून दुसऱ्या दिवशी घरी परतल्यानंतर मैत्रिणीला भेटण्यासाठी दुसऱ्या हॉस्टेलला गेले. दुसऱ्या दिवशी एका लग्नाला जायचे होते. सर्व मैत्रिणी त्याच तयारीत होत्या. तयारीनंतर मी मी परतत होते. पोहोचलेही होते, पण पायऱ्यांवर फक्त दोन पावले दूर असतानाच मला एका गाडीत खेचण्यात आले. एक युवक आणि पीजीच्या एका मुलीने ते पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली, पण पोलिसांनी मला ट्रेस करेपर्यंत उशीर झाला होता.

घटनेनंतर मी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. मी अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील आहे. त्यामुळे आई-वडिलांची स्थिती काय होईल, ते आत्महत्या तर करणार नाहीत ना? याची भीती होती. दुसरे म्हणजे अशी नोकरी करण्याची परवानगी मिळणारी मी कुटुंबातील तसेच समाजातील पहिलीच मुलगी होते. माझी अवस्था ऐकून कुटुंबीय आणि नात्यातील सर्व मुलींचा मार्ग बंद झाला असता. हा विचार करूनच मी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. आपले दु:ख विसरावे असे वाटत होते, पण नंतर कळाले की माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांनी आधी ९ वर्षांच्या आणि १३ वर्षांच्या मुलीवरही असाच अत्याचार केला होता. पण त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिष्ठेसाठी प्रकरण दाबले. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली.

पोलिसांनी समजावले की, ते बाहेर येऊन आणखी काहींचे आयुष्य बरबाद करतील. त्यामुळे मी धैर्याने एफआयआर दाखल केला. तोपर्यंत मी पालकांना ही घटनाही सांगितली नव्हती. पण एफआयआर दाखल केल्यानंतर छळाचा एक नवा सिलसिला सुरू झाला. आरोपींच्या वकिलांनी माझा नंबर कुठूनतरी मिळवला. आई-वडिलांना कळवले. त्यांचा विश्वासच बसला नाही. आत्महत्येचा विचारही मनात आला. कशाला नोकरीसाठी गेली, असे टोमणे नातेवाईक मारत होते.

एका पोलिस अधिकारी माझ्यासाठी मोठे भाऊ म्हणून समोर आले. त्यांनी आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. माझी बहीण माझ्यासोबत होती. चार दिवसांतच पोलिसांनी तिन्ही आरोपींना पकडले. गतिमान न्यायालयाने त्यांना एका महिन्यात शिक्षा सुनावली. नव्या कायद्यानुसार दोघांना जन्मठेप आणि एकाला २० वर्षांची शिक्षा झाली. त्याच वेळी पोलिस कॉन्स्टेबलच्या भरतीची माहिती मिळाली. मी पोलिस विभागात दाखल होण्याची तयारी केली, पण कुटुंबीय नाराज होते. तरीही कॉन्स्टेबलची नोकरी स्वीकारली. वेतन एवढे अपुरे होते की एकटीचा खर्चही निघत नव्हता. सरकारतर्फे पाच लाख देण्याचे आश्वासनही हवेत विरले. वर्षभर मदत मिळाली नाही. पण कायद्याची पदव्युत्तर पदवी आणि खात्यातील परीक्षा देऊन मी इतरांना मदत करू शकेन अशी स्थिती तयार करणार आहे. माझ्यासारख्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना धडा शिकवू शकेन अशा पोस्टवर जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...