आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lakhs Of Students Did Not Get Mid Day Meal In Bihar

मध्यान्ह भोजन विषबाधा प्रकरणानंतर शिक्षकांचा संप, बिहारमध्ये लाखो विद्यार्थी उपाशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- देशभरात गाजलेल्या मध्यान्ह भोजन प्रकरणात बिहार राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी सलग दुसर्‍या दिवशी संप पुकारला होता. त्यामुळे सुमारे 10 लाख विद्यार्थ्यांवर दोन दिवसांपासून उपाशी राहण्याची वेळ आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सरन, पुर्निया, शेहार, अरेरिया जिल्ह्यांतील शाळांतील मध्यान्ह भोजन योजनेवर शिक्षकांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला आहे, असे बिहारच्या मध्यान्ह भोजन योजनेचे संचालक आर. लक्ष्मणन यांनी सांगितले. राज्यातील 95 टक्के शाळांमध्ये सरकारने मध्यान्ह भोजन योजना लागू असल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांच्या संपाचा 20 टक्के परिणाम झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. मध्यान्ह भोजनातील मृत विद्यार्थ्यांना सभागृहात शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 2 ऑगस्टपर्यंत चालणारे अधिवेशन सरकारसाठी वादळी ठरण्याची शक्यता आहे.

विरोधक विषारी अन्न खाऊन मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, पूर्व दिल्लीतील महानगरपालिकेच्या शाळेत विषारी भोजन केल्याने चार मुले आजारी पडल्याची घटना शुक्रवारी उजेडात आली आहे. सोनिया विहार या साभापूर भागातील शाळेत ही घटना घडली. त्या वेळी सुमारे 500 मुलांनी हे भोजन घेतले होते.

आजारी पडलेल्या मुलांना रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोजनाचा नमुना चाचणीसाठी घेण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तो पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशभरात गेल्या आठ दिवसांपासून मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थी आजारी पडण्याचे प्रकार महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडूसह अनेक राज्यांत घडल्याचे उजेडात आले आहे.

काय आहे प्रकरण ?

गेल्या मंगळवारी बिहारमधील धरमसती गंदमान प्राथमिक शाळेत विषारी भोजन खाल्ल्याने 23 विद्यार्थ्यांवर मृत्यू ओढवला. त्यानंतर त्या शाळेची मुख्याध्यापिका मीनाकुमारी हिला अटक के ल्यामुळे राज्यातील प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेने संप पुकारला आहे. सरकारने शिक्षकांवरील अध्यापनेतर कामांचा बोजा कमी करावा, अशी या शिक्षकांची मागणी आहे.


पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सहकार्य करा

शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर कामे करावी लागतात. त्याच्याशी सरकार सहमत आहे. शिक्षकांनी जेवण तयार करणे महत्त्वाचे नाही, तर शिकवणे त्यांचे मूळ काम आहे व तेच गरजेचे आहे, परंतु पर्यायी व्यवस्था निर्माण होईपर्यंत शिक्षकांनी सहकार्य करावे. मध्यान्ह भोजन योजना ही सर्वाेच्च् न्यायालयाच्या निर्देशानुसार चालवली जात आहे. त्यामध्ये खंड पडू नये. ती सुरळीत ठेवण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य करावे. -नितीशकुमार, मुख्यमंत्री.