आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालू-नितीशची चिरेबंदी युती भाजपला शह देण्यासाठी एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - एकेकाळी परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मंगळवारी एकाच व्यासपीठावर एकत्र येत भाजपला बिहारमधून हद्दपार करण्याचा निर्धार व्यक्त केला. धर्मनिरपेक्ष आघाडीच्या घोषणेनंतर प्रथमच एकत्र येत या दोन्ही दिग्गज नेत्यांनी संयुक्तरीत्या भाजपला प्रथमच आव्हान दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्णपणे पराभूत करण्याचा विडाच उचलल्याचे त्यांनी दाखवून दिले.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालुप्रसाद यादव यांचा प्रभाव जवळपास संपुष्टात आणला होता. एकेकाळी राज्यात वर्चस्व गाजवणार्‍या या दोन्ही नेत्यांनी आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणले आणि धर्मनिरपेक्ष आघाडी स्थापन केली. एकेकाळी परस्परांचे प्रतिस्पर्धी असलेले नितीश व लालू एकत्र आल्याने अनेक राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्य वाटले होते. मंगळवारी मात्र बिहारी जनतेने या नेत्यांत कमालीचे सख्य अनुभवले. हिंदुस्तान समागम कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नितीश व लालू एकत्र बसले. निवडणूक अजेंड्यावरही चर्चा झाली.

दोनदा चुकामुक ; यापूर्वीही नितीश कुमार व लालूप्रसाद यांच्या संयुक्त कार्यक्रमांचे दोन वेळा आयोजन करण्यात आले होते. मात्र, दोन्ही वेळा नितीश यांनी कार्यक्रमाला उपस्थिती टाळली होती.

भाजपवर टीकेची झोड, परस्परांचे गोडवे
हिंदुस्तान समागमच्या व्यासपीठावरून दोन्ही नेत्यांनी भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली. भाजप देशात जातीचे राजकारण माजवत असल्याची टीका नितीश यांनी केली. धर्मनिरपेक्ष पक्षच जातीचे राजकारण करतात, असा अपप्रचार भाजप करत आहे, असे ते म्हणाले. नितीश कुमारांशी युती करण्याची राजदची भूमिका या वेळी लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केली. आम्ही समविचारी असून ही युती योग्यच असल्याचे लालूप्रसाद म्हणाले. जयप्रकाश नारायण यांच्या कारकीर्दीतील उदाहरणेही त्यांनी या वेळी दिली. विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी नितीश यांनी मदत केली होती. तसेच १९९० मध्ये मुख्यमंत्रिपदी असतानाही त्यांची मदत झाल्याचे अनुभव कथन लालू यादवांनी या वेळी केले.

भाजपने केले होते नितीशना "हायजॅक'
मधल्या काळात नितीश यांचे भारतीय जनता पक्षाने अपहरण केले होते. त्यांना आता मी तावडीतून सोडवले आहे, अशी विनोदी टिप्पणीही लालूंनी या वेळी केली. या निवडणुकांमध्ये भाजपची घरवापसी करण्याचा निर्धार लालूंनी व्यक्त केला. नितीश कुमार हे सेक्युलर आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, याला प्रथमच लालूंनी सहमती दर्शवली. काँग्रेसने नितीश कुमारांनाच पसंती दिल्याने राजदला हे मान्य करावे लागले.