आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप म्हणाला, रॅली पुढे ढकला, लालूंकडून नकार; सरकारविरोधात करणार आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - राजकीय आखाड्यात आपल्या वक्तव्याने, तर कधी पवित्र्याने वादात राहणारे राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी ऐन पुराच्या परिस्थितीत रॅली काढण्याची गर्जना करून टाकली आहे. ही रॅली पुढे ढकलण्यात यावी, असे आवाहन नवीन सत्ताधारी पक्षातील सहकारी पक्ष भाजपने केले. मात्र, लालूंनी ‘मुळीच नाही’, असे सांगून ते फेटाळले.  

राज्यातील जनता सध्या दुष्काळी संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत रॅली काढून लालू काय हशील करणार आहेत?  त्यापेक्षा २७ ऑगस्टची रॅली पुढे ढकलण्यात यावी, असे आवाहन मी त्यांना करतो. कारण राज्यातील १ कोटीहून अधिक जनता पूरग्रस्त आहे. महापुरात मदतीला धावले पाहिजे. परंतु मदत करण्याऐवजी रॅली काढण्यात आली तर ती राजदची लोकांविषयी असलेली असंवेदनशीलता म्हणावी लागेल, असे भाजप नेते व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटले आहे. खरे तर ही रॅली पुढे ढकलली तर पूरग्रस्तांसाठी त्यांच्या मनात काही तरी कणव आहे, असे दिसेल. पक्षाचे भविष्यदेखील सुरक्षित राहील. त्याशिवाय तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनादेखील पुराचा खरा अनुभव येईल, असा सल्लाही सुशीलकुमार मोदी यांनी दिला.
 
सुशील मोदींनी मला शिकवू नये: लालू  
रॅली स्थगित करायची किंवा पुढे ढकलायची हे सुशील मोदींनी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. ही रॅली निघणार आहे. त्यात पंचवीस लाख लोक सहभागी होतील. पूरग्रस्त जिल्ह्यातील लोक रॅलीत सहभागी होतील. दुसरीकडे गेल्या वर्षी महाआघाडीचे सरकार असताना पंतप्रधान मोदी बिहारच्या दौऱ्यावर का आले नव्हते? यंदा मात्र त्यांना पूरग्रस्त भागासाठी वेळ काढता आला. त्यांचा हा दौरा म्हणजे नुसतीच ‘हवाखोरी’ असल्याची टीका लालूंनी केली. 
बातम्या आणखी आहेत...