आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेडीयू म्हणजे जनतेचे दमन! पंतप्रधानांच्या टीकेवर नितीश-लालू यांचे चोख प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार एकत्र. - Divya Marathi
एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार एकत्र.
गया / पाटणा -बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी दुसरी प्रचारसभा गया येथे झाली. या सभेत मोदींनी जदयू-राजद युतीवर जाेरदार आसूड ओढले. जदयू म्हणजे "जनतेचे दमन' करणारी पार्टी असल्याचे मोदी म्हणाले. यावर, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत बीजेपी म्हणजे "बडका झुठा पार्टी' असल्याची टीका केली.

गांधी मैदानात आयोजित परिवर्तन जाहीर सभेत मोदी म्हणाले, "राजकीय स्वार्थासाठी यांनी युती (राजद-जदयू) केली खरी, मात्र निवडणुकीनंतर पुन्हा ते एकमेकांवर फुत्कार सोडतील. काहींनी असेही विष घेतले आहे. ते निवडणुकीनंतर बाहेर पडेल. जनतेच्या ताटात ते पडले तर जनता मरेल आणि हे लोक जगतील. बिहारला या विषारी लोकांची गरज नाही. बिहारमध्ये नेमके कोण भुजंग प्रसाद आणि कोण चंदन कुमार आहेत काय माहीत?'

या टीकेनंतर नितीश यांनी तत्काळ फेसबुक आणि ट्विटरवर प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "आमच्या सरकारमध्ये जनतेचा छळ झाला असेल तर पंतप्रधानांनी त्याचे पुरावे द्यावेत. याच कारणांवरून २००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींचे कान फुंकले होते. देशाला हे चांगले माहीत आहे.' दरम्यान, बिहारमध्ये आता राजकारण तापू लागले आहे.
मोदींच्या प्रत्येक मुद्यावर पलटवार
मोदी : कोणी जेलमधून आला तर तेथील वाईट सवयी घेऊनच येतो. आता पुन्हा हे जंगलराज-पार्ट टू आले तर त्यात जेलमधील हे प्रकार जोडले जातील. राज्याचे नुकसान ठरलेलेच.
नितीश : आता जेल म्हणजे सुधारगृह म्हणून ओळखले जातात. तेथे माणूस सुधारावा म्हणून पाठवला जातो. मोदी म्हणतात, या जेलमधून वाईट गोष्टी शिकून माणूस बाहेर पडतो. त्यांच्या पक्षाचे अमित शहा जेलमधून काय-काय वाईट गोष्टी शिकून आले ते मोदींनी सांगावे.

२५ वर्षे वाया गेली
मोदी : जनतेचे दमन आणि उत्पीडन (छळ) पार्टी (जदयू) आणि रोज जंगलराजचे डर (राजद) पार्टीने बिहारची २५ वर्षे वाया घालवली. त्यांना पुन्हा सत्ता देणे योग्य नाही.

नितीश : माझ्या सरकारने केलेल्या विकासात भाजपचा वाटा नसल्याचे मान्य केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार. भाजपवाल्यांनीच सांगावे की, थोरले मोदी (नरेंद्र मोदी) खरे की धाकटे मोदी! (सुशीलकुमार मोदी)