आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरदासपूर हल्ल्याचा निषेध करणाऱ्या इमामांना लश्करची जीवे मारण्याची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - पंजाबच्या शाही इमामांनी लश्कर ए तोयबा संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पत्राच्या आधारे गुन्हा नोंदवला असून इमामांच्या सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. तीन आठवड्यांपूर्वी गुरदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शाही इमामांनी निषेध केला होता. तसेच या हल्ल्याचे सडेतोड उत्तर पाकिस्तानला द्यावे, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती.

गुरदासपूरमध्ये दहशतवाद्यांनी 29 जुलैला एका पोलिस ठाण्यावर हल्ला चढवला होता. यामध्ये अनेक पोलिस अधिकारी शहीद झाले होते, तसेच काही सामान्य नागरिकांनाही प्राण गमवावे लागले होते. पंजाब पोलिसांनी 12 तासांच्या चकमकीनंतर दहशतवाद्यांना ठार केले होते.

याआधीही झाला आहे हल्ला
मौलाना हबीब उर रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार सकाळी जेव्हा ते मशिदीकडे निघाले होते त्यावेळी त्यांना घराच्या बाहेर धमकीचे पत्र मिळाले. मशिदीत नमाजनंतर जेव्हा त्यांनी ते पाकिट उघडून पत्र वाचले तेव्हा त्यात इमामांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका पानाचे हे पत्र उर्दू भाषेमध्ये लिहिण्यात आलेले आहे. त्यानंतर इमामांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मौलाना हबीब यांच्यावर गेल्या दीड वर्षामध्ये पाचव्यांदा अशा प्रकारची धमकी मिळाली आहे. तसेच त्यांच्यावर यापूर्वी एकदा हल्लाही झाला होता.

इमाम म्हणाले, घाबरणार नाही
शाही इमामांचे स्वीय सचिव मुहम्मद मुस्तकीम म्हणाले की, धमकी असलेल्या पत्रामध्ये आमीर नावाच्या व्यक्तीने इमामांना भारताप्रति देशभक्ती दाखवल्यामुळे आणि पाकिस्तानवर टीका केल्याने गद्दार असे संबोधले आहे. तर इमामांनी म्हटले की, माझ्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचा त्याग केला आहे. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरणार नसल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी तपासानंतर या पत्राच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.