आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News About Now Railway Staff Will Provide First Aid, Divya Marathi

रेल्वे स्टाफकडून प्रथमोपचार, 15 ऑक्टोबरपासून प्रशिक्षण, जीवरक्षक औषधेही उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - आता रेल्वमध्ये प्रवास करताना एखादा प्रवासी अचानक आजारी पडला तर त्याला रनिंग स्टाफकडून त्वरित प्रथमोपचार केले जातील. 15 ऑक्टोबरपासून रेल्वे त्यासाठी विशेष प्रशिक्षण अभियान सुरू करणार आहे. याअंतर्गत टीटीई, कोच अटेंडंट, पायलट व गार्ड आदींना प्रथमोचाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच बरोबर प्रथमोपचाराची सर्व औषधे तसेच जीवरक्षक औषधेही संबंधितांकडे उपलब्ध असतील. 2015 अखेरपर्यंत देशभरात हा प्रशिक्षण प्रोग्राम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.

सध्या रेल्वेमध्ये वैद्यकीय सुविधांच्या नावाखाली केवळ सी कोचमधील प्रवाशांनाच प्रथमोपचार व फर्स्ट एड किट उपलब्ध करून दिली जाते. त्याऐवजी ही सुविधा सर्व गरजूंना देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. नव्या प्रथमोपचार उपचार व्यवस्था प्रणाली सर्वच क्लासमधील प्रवाशांना दिली जाईल. त्यासाठी रेल्वे स्वत:च्या सेवेतील कर्मचार्‍यांनाच त्याचे प्रशिक्षण देणार आहे. 15 ऑक्टोबरपासून त्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण प्रोग्राम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात टीटीई व त्यानंतर कोच अटेंडंटसह इतर कर्मचार्‍यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याची जबाबदारी विभागीय रेल्वे अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. रेल्वे वैद्यकीय रुग्णालयातील तज्ज्ञांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांना सहा - सहा महिन्यांचा कालावधी ठरवून देण्यात आला आहे. त्यानंतर स्थानिक पातळीवर कर्मचार्‍यांना हे प्रशिक्षण दिले जाईल.

डॉक्टरांची अशीही उदासीनता
रेल्वेतून प्रवास करणार्‍या डॉक्टरांनी रिझर्व्हेशन फॉर्ममध्ये त्यांच्या पेशाचा उल्लेख केला असेल तर त्यांना दहा टक्के सवलत दिली जाते. याचा उद्देश रेल्वेत कुणी अचानक आजारी पडले तर त्यांच्या सेवेचा लाभ घेता येईल, हा असतो; परंतु बहुतांश डॉक्टर या सेवेचा लाभच घेत नाहीत. डॉक्टरांनी त्यांची माहिती रिझर्व्हेशन चार्टमध्ये दिल्यास त्याचा फायदा बिकट परिस्थितीत घेता येऊ शकतो.

खासगी रुग्णालयांचे सहकार्य घेणार
प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाची तब्येत खूपच बिघडली तर रेल्वे रुग्णालयाव्यतिरिक्त सरकारी किंवा प्रसंगी खासगी रुग्णालयांचीही मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी संबंधित स्टेशनचे व्यवस्थापक, स्टाफ रुग्णाची माहिती मिळाल्यावर त्यांच्याकडे उपलब्ध रुग्णालयांच्या सूचीनुसार अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून ठेवतील. रेल्वेचा तेथे थांबा नसला तरीही वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत रेल्वे थांबूवन रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाईल.