आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Mars Mission Space War And India China Nasa

यशस्वी झेप: भारताची यात्रा \'मंगलमय\'; 50 मिनिटे रॉकेटच्या वेगाने श्वास रोखला, अखेर जल्लोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेसपोर्ट (श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश)- घड्याळात दोन वाजून 37 मिनिटे आणि 50 सेकंद झाले होते. तेव्हाच प्रक्षेपणाचे काउंटडाऊन सुरू झाले. 10, 9, 8.. 3, 2, 1. आणि धमाक्यासह पीएसएलव्ही सी 25ने झेप घेतली. नियंत्रण कक्षात बसलेल्या 100 वर वैज्ञानिकांच्या चेहर्‍यांवरील भाव रॉकेटच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने बदलत होते. सर्वांच्या नजरा कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर होत्या. रॉकेटची गती, इंधन आणि दिशेसंबंधी माहिती त्यावर येत होती. सेकंदाच्या हजाराव्या भागापर्यंतच्या वेळेची बिनचूक आकडेवारी मिळत होती. बरोबर 44.17 मिनिटांनी रॉकेटने मंगळयानाला 383 कि.मी. उंचावरील पृथ्वीच्या कक्षेत नेऊन सोडले. त्यापाठोपाठ नियंत्रण कक्षात शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.

मंगळ मिशनचे प्रक्षेपण श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून झाले. पीएसएलव्हीने आपल्या 25 व्या मिशनमध्ये 1,350 किलोग्रॅम वजनाचे मंगळयान पृथ्वीच्या कक्षेत सोडले. या मिशनसाठी 450 कोटी रुपये खर्च आला आहे. सगळे काही ठीक झाले तर मंगळावर पोहोचणारी इस्रो ही जगातील चौथी अंतराळ संस्था ठरेल. आजवर अमेरिका, रशिया व युरोपियन समुदायच मंगळ मिशनमध्ये यशस्वी झाले आहेत. दरम्यान, राधाकृष्णन यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करत 20 ते 25 जणांनी हातात पत्रके घेऊन जोरदार घोषणा दिल्या.

24 सप्टेंबर 2014
> 300 दिवसांच्या प्रवासानंतर यान 24 सप्टेंबर 2014ला मंगळाच्या कक्षेत प्रवेश करील. गतीमुळे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाला बळी पडून ते ग्रहाला जाऊन धडकू शकते. त्यामुळे त्याची गती तेव्हा कमी करावी लागेल.

> 450 कोटी रु. मोहिमेचा खर्च
> 2.38 वा. र्शीहरिकोटाच्या अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण
> 44.17 मिनिटांत यान भूस्थिर कक्षेत
> 80 हजार कि.मी. उंचीवरून मंगळाभोवती फेर्‍या मारणार

तारखा आणिआव्हाने
1 डिसेंबर 2013
> मंगळयान 25 दिवस पृथ्वीभोवती फिरल्यानंतर 30 नोव्हेंबर आणि एक डिसेंबरच्या रात्री 12.42 वाजता पृथ्वीची कक्षा सोडेल. येथून सुमारे 40 कोटी कि.मी.च्या मंगळ यात्रेला ते रवाना होईल.

पूर्णपणे स्वयंचलित
मंगलयान स्वत:च संचलित होणारे आहे. आपत्कालीन स्थितीचाही सामना करू शकते. पृथ्वी व मंगळातील अंतरामुळे ग्राउंड स्टेशनवरून 20 मिनिटांत सिग्नल यानापर्यंत पोहोचतील. उत्तर येण्यासाठीही 20 मिनिटे लागतील. काय घडत आहे ते 40 मिनिटांनंतरच कळू शकेल. त्यामुळे यान स्वयंचलित करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्याची 44.17 मिनिटे
> लाँचिंगनंतरचा एक मिनिट 32 सेकंद पहिल्या टप्प्यासाठी लागले. सहा स्ट्रॅपऑन वेगवेगळे झाले. 21 सेकंदांनंतरच पहिला टप्पा वेगळा झाला. रॉकेट 28 कि.मी. उंचीवर होते.

> दुसरा टप्पा 4.25 मिनिटांनी वेगळा झाला. रॉकेट 133 किमीवर होते.

> तिसरा टप्पा 9 मिनिटे 44 सेकंदांनंतर वेगळा झाला. तेव्हा रॉकेट पृथ्वीपासून 195 किलोमीटर उंचीवर होते.

> चौथा टप्पा 44 मिनिट 17 सेकंदांनंतर वेगळा झाला. मंगळयान निर्धारित कक्षेत पोहोचले. हा टप्पा यशस्वी होताच कंट्रोल सेंटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

जीवसृष्टी आणि पाण्याचा शोध घेणार
> मंगळयानासोबत पाच उपकरणेही आहेत. तेथील मिथेन, ड्यूटेरियमखेरीज ते जीवसृष्टी आणि पाण्याचाही शोध घेतील.

> 80 हजार कि.मी. उंचीवरून मंगळाभोवती फेर्‍या घालत गॅस, खनिज आणि वातावरणाची माहिती जमवली जाईल.

> 450 कोटी खर्चाची ही मोहीम सर्वात स्वस्तातील आहे. आतापर्यंत मंगळावर 56 याने पाठवली गेली. यातील दोनतृतीयांश अयशस्वी.

> यशस्वी मंगळ मोहिमात अमेरिका, रशिया, युरोपियन समुदायाच्या आहेत. चीन व जपानच्या मोहिमा अयशस्वी ठरल्या.

ही तर सरकारकडून गरिबांची थट्टा : मंदर
भारतात दररोज रात्री 23 कोटी लोक उपाशीपोटी झोपतात. अशा वेळी मंगळ मोहिमेवर 450 कोटी खर्च करणे गरिबांच्या मानसन्मानाची थट्टाच ठरते, असे सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी म्हटले आहे. मंगळावर जीवसृष्टी नसल्याचे नासाने प्रयोगाद्वारे दाखवून दिले. तरीही ते देशाला मूर्ख बनवत आहेत. त्यातही काही र्मयादा असते, असे माजी इस्रोप्रमुख माधवन नायर यांनी म्हटले आहे.

इस्रोप्रमुख टीमला घेऊन तिरुपतीला जाणार
मंगलयान मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात यश आल्याने आनंदित झालेले इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन बुधवारी पुन्हा तिरुपतीच्या वेंकटेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. वैज्ञानिकांची पूर्ण टीम येणार असल्याचे देवस्थानमच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. लाँचिंगपूर्वी राधाकृष्णन यांनी मंदिरात पूजा-अर्चा केली होती. दोन दशकांपासून इस्रोप्रमुख प्रत्येकच मोहिमेआधी या ठिकाणी पूजा-अर्चा करतात.

पुढील स्लाईड्‍वर वाचा, चीनला हवी आहे अंतराळात शांतता..