भुवनेश्वर - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ओडिशामध्ये रॅली केल्यानंतर आज (मंगळवार) भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर येथील रॅलीला संबोधीत केले. मोदींनी ओडिशा सरकार, थर्ड फ्रंट आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, थर्ड फ्रंट संकटात सापडलेल्या काँग्रेसला केवळ मदत करण्यासाठी आहे.
सर्व सभांमध्ये केवळ गुजरातचे गुणगाण गाणा-या मोदींनी येथे वेगळा राग आळवला. त्यांनी छत्तीसगडमधील डॉ. रमणसिंह सरकारचे कौतूक केले. ते म्हणाले, छत्तीसगडमध्ये डॉ. रमणसिंह सरकारने शेतक-यांच्या हिताचे काम केले आहे. त्याचा परिणाम आता तिथे दिसू लागला आहे. आज छत्तीसगड अन्न-धान्याने परिपूर्ण राज्य असून शेजारी राज्यांचेही पोट भरत आहे. मध्यप्रदेशही बिमारू राज्यांमध्ये होते. मात्र,
शिवराजसिंह चौहान यांनी सरकारचे नेतृत्व हातात घेतले आणि या राज्याने विकासाचा नवा उच्चांक गाठला आहे. छत्तीसगड-मध्यप्रदेशमध्ये हे होऊ शकते तर, ओडिशात का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ओडिशावर बोलले मोदी
ओडिशाच्या आर्थिक स्थितीवर मोदी म्हणाले, येथील युवक बेरोजगार आहेत त्यामुळे ते गुजरातमध्ये येऊन नोकरी करतात. ओडिशाच्या प्रत्येक जिल्ह्यातून युवक गुजरातमध्ये आलेले आहेत. यात मुख्यमंत्र्यांचा जिल्हा देखील आहे. ते म्हणाले, येथे वीज, पाणी, रोजगारांची कमतरता आहे. आरोग्याच्या पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे रोजी-रोटीसाठी येथील युवक वृद्ध आई-वडीलांना येथे सोडून परप्रांतात जात आहेत. कोणत्या आई-वडीलांना आणि मुलांनाही हे आवडणार आहे. मात्र, येथील परिस्थिती एवढी वाइट झाली आहे, की तरुणांना घर-शेत आणि मित्रांना सोडून जावे लागत आहे.
भूवनेश्वरच्या कारागिरांबद्दल ते म्हणाले, येथे साड्यांवर सुंदर विणकाम करणारे कारागिर आहेत. मात्र, येथे रोजगार नसल्यामुळे त्यांना परराज्यात जाऊन मोलमजूरी करावी लागत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींची रॅली