पाटणा - बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात दसर्याच्या दिवशी रावण दहनानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत मरणार्यांची संख्या 33 वर गेली आहे. शनिवारी भाजप नेते रविशंकरप्रसाद, मंगल पांडे यांच्या नेतृत्वात गांधी मैदानमध्ये कँडलमार्च काढण्यात आला आहे. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी बिहार सरकारवर टीका केली. ते म्हणाले, 'चेंगराचेंगरी झाल्यानंतर पंतप्रधानांनी बिहारमध्ये दिल्लीहून डॉक्टरांचे पथक पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र राज्याचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी, बिहार सरकार सक्षम असल्याचे सांगत मदत नाकारली.'
रावण दहन नंतर झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहे. दुसरीकेड, या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि प्रशासकीय पातळीवरील अनागोंदी समोर आली आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता मृतांचे नातेवाइक पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या शवागृहाकडे गेले तेव्हा गेटला कुलूप होते. त्यामुळे संतप्त नातेवाइकांनी कुलूप तोडले. काही लोकांनी हॉस्पिटलसमोरील चौकात बसून रास्तारोको केला. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
काय होती घटना
शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता गांधी मैदानात रावण दहनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी पाच लाखांच्या जवळपास लोक उपस्थित होते. गांधी मैदानाला सहा प्रवेशद्वार असताना केवळ दोन गेट उघडण्यात आले होते. रावण दहनानंतर लोक बाहेर पडत असताना अचानक गोंधळ उडाला आणि लोक सैरावैरा धावू लागले. यात 100 हून अधिक लोक जखमी झाले. 26 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
का उडाला गोंधळ
- मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक महिला गड्ड्यात पडली. तिला उचलण्यासाठी तीन-चार लोक खाली वाकले असताना मागून आलेले लोक त्यांच्यावर पडले आणि गोंधळ उडाला.
- एका प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे, की काही लोक ओरडत होते, की वीजेची हायटेंशन वायर तुटली त्यामुळे लोक पळापळ करू लगाले होते.