आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगली टाळण्यासाठी सिंगापूरचा धडा घ्यावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन दंगली. एक हरियाणाच्या मिर्चपूरमध्ये चार वर्षांपूर्वी झालेली. दुसरी सिंगापूरच्या लिटिल इंडियामध्ये दीड महिन्यापूर्वीची. ‘भास्कर’ने दोन्ही ठिकाणी जाऊन परिस्थिती समजून घेतली. आपल्या तयारीतील त्रुटी आणि सिंगापूरकडून काय धडा घेतला जाऊ शकतो याचा घेतलेला हा वेध...
मिर्चपूर : दंगलग्रस्त दलित चार वर्षांपासून अद्यापही गावाबाहेरच
निशिपाल सिंह. हिसार
हिसारपासून 70 किलोमीटर अंतरावर असलेले मिर्चपूर हे गाव. 15 हजार लोकसंख्येत जाटांची संख्या अधिक. मागील पाच दशकांत या गावातील एक हजारहून जास्त लोक शिक्षक बनले आहेत, ज्ञानाचा प्रकाश पेरण्यासाठी! पण या गावाला एक काळी किनारही आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या जातीय दंगलीनंतर गाव सोडून गेलेल्या 100 दलित कुटुंबांपैकी आजपर्यंत एकही कुटुंब परतू शकलेले नाही.
सरकार दलितांना वारंवार गावात परत जायला सांगते. चोख सुरक्षा देण्याचे आश्वासन देते. परंतु दंगलीमध्ये दोन दलितांचा मृत्यू झाल्यानंतर जाटांनी पोलिसांच्या डोळ्यादेखत त्यांची घरे जाळून खाक केली होती. उद्ध्वस्त झालेल्या घरांमध्ये आम्ही कसे राहू शकतो? आम्हाला पुनर्वसनासाठी हिसारमध्येच जागा द्या, असे ते म्हणतात. मागील एक वर्षापासून पुनर्वसनासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. त्यांच्या सर्व आशा आता न्यायालयावरच विसंबलेल्या आहेत. दलितांमध्ये एवढी प्रचंड दहशत आहे की सुरक्षेच्या कोणत्याही आश्वासनावर त्यांचा तिळमात्र विश्वास बसत नाही. घटनेच्या काही दिवसांनंतर राहुल गांधी येऊन गेले खरे; पण झाले काहीच नाही.
संपूर्ण गावात आजही भयाण शांतता पसरलेली आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर सांडपाणी आणि चिखल साचलेला आहे. तो ओलांडून गावात पोहोचताना कसरत करावी लागते. एका घराचे दार उघडले तर खोल्यांमध्ये गवत उगवल्याचे दिसले. 21 एप्रिल 2010 रोजी तीन खोल्यांच्या याच घरात ताराचंद आणि त्यांची अपंग मुलगी सुमनला जाळून मारण्यात आले होते.
आपल्याच गावापासून विस्थापित झालेल्या दलितांपैकी बहुतांश जण वेदपाल तंवर या सामाजिक कार्यकर्त्याच्या फार्महाऊसवर टाकलेल्या तंबूतच राहतात. उर्वरित . पान 7 वर
मिर्चपूर : चार वर्षांपासून गावाबाहेर राहण्याची दंगलग्रस्त दलितांवर वेळ
मागील चार वर्षांपासून येथे एकही लग्न झाले नाही की मुलेही शाळेत शिकायला गेलेली नाहीत. तंवर यांच्या कृपेवरच त्यांची गुजराण सुरू आहे. सरकार त्यांची दखलही घ्यायला तयार नाही.
पावसामुळे तंबूंमध्ये पाणी साचलेले आहे. लोकांना सामान उचलून खाटल्यावर ठेवावे लागत आहे. महिला वारंवार तंबूत साचलेले पाणी बाहेर उपसून फेकताना दिसतात. ओलाव्यामुळे बहुतांश मुले आजारी पडलेली आहेत. 58 वर्षीय संतरादेवीला सहा अपत्ये आहेत- तीन मुले, तीन मुली. आता त्यांना 22 वर्षांची मुलगी सुमनच्या लग्नाची काळजी सतावू लागली आहे.
70 वर्षांची लक्ष्मी मुलगा, सून आणि पाच नातवंडांबरोबर राहते. मुलाने रोजमजुरी केली तरच दोन घास पोटात जातात. उपचारासाठी पैसे नाहीत. गावात त्यांचे पक्के घर होते आणि कामधंदाही व्यवस्थित चालू होता. तेथे पुन्हा गेलो तर सर्वांना मारून टाकतील, असे अश्रूंचे ओघळ पुसत लक्ष्मी सांगते. याच दरम्यान दंगलग्रस्तांनी शस्त्रे चालवण्याचा चांगलाच सराव केलेला आहे. येथे 40 लोकांकडे परवाने असलेली शस्त्रे आहेत. त्यांनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती, तर सरकारने त्यांनाच शस्त्रांचे परवाने देऊन टाकले.
मागील वर्षात अनेक दंगलपीडित कुटुंबे गावात परतली आहेत. तेथे ती सुरक्षित आहेत. पुन्हा आपली रोजीरोटी कमावू लागली आहेत. मात्र तंवर फार्म हाऊसवर राहत असलेली कुटुंबे गावी परतू इच्छित नाहीत. वेदपाल तंवरही या मुद्द्याला राजकीय रंग देत आहेत. त्यांचेच ऐकून ते लोक प्रशासनावर पुनर्वसनासाठी दबाव आणत आहेत.
एम. एल. कौशिक, जिल्हाधिकारी, हिसार.
सिंगापूर : एका दंगलीनंतर महिनाभरातच बदलला कायदा
राजेश माळी. सिंगापूर
लिटिल इंडिया. सिंगापूरमध्ये कामधंद्यासाठी आलेल्या भारतीय लोकांच्या खाण्या-पिण्याचा आणि भेटीगाठींचा प्रसिद्ध परिसर. रविवारी तर येथे जणू भारतीयांची जत्राच भरते. मागच्या 8 डिसेंबरला येथे बसखाली चिरडून एका भारतीयाचा मृत्यू झाल्यामुळे दंगल भडकली होती.
चार दशकांत पहिल्यांदाच सिंगापूरमध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती...पण आता सिंगापूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी कुणीही दारू पिऊ शकत नाही...आधी असे सर्रास केले जात होते. लिटिल इंडियामध्ये दारूची विक्री आणि लोकांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी वेगळा कायदा लागू करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांना जास्तीचे अधिकार मिळणार आहेत. सध्या हा कायदा वर्षभर अस्तित्वात राहील. भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो दारूच्या नशेत होता. अपघात आणि त्यानंतर झालेल्या दंगलीला दारू हे एक कारण मानले जात आहे. त्यानंतर दारू हा सिंगापूरमध्ये चर्चेचा विषय बनला. भारतात अशा घटनांनंतर पोलिसात केस, मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई आणि जास्तीत जास्त न्यायालयीन चौकशीची घोषणा अशी पावले उचलली जातात. मात्र 50.76 लाख लोकसंख्येच्या सिंगापूरने एका दंगलीनंतर जी पावले उचलली ती आपल्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरू शकतात.
चार दिवसांपूर्वी सिंगापूरच्या संसदेत उपपंतप्रधान आणि गृहमंत्री तो ची हीन यांनी या घटनेसंदर्भात सांगितले की, आम्ही घटनेच्या अनुभवातून महत्त्वाचा धडा घेतला आहे. अशा घटनांचा सामना करण्यासाठी आपण कशा पद्धतीने अधिक भक्कमपणे तयार असायला हवे, हेही आम्ही शिकलो आहोत.
सिंगापूर : एका दंगलीनंतर महिनाभरातच बदलला
देशाचा कायदा
सिंगापूरमध्ये येऊन जवळपास 12 लाख परदेशी नागरिक काम करतात. त्यापैकी सुमारे 3 लाख भारतीय कामगार आहेत. ते बांधकामावर काम करतात. सिंगापूर सरकार देशाच्या विकासातील त्यांना महत्त्वाचा घटक मानते. परदेशी कामगारांच्या बाबतीत सिंगापूरच्या लोकांमध्ये गैरसमज पसरू नयेत, याची काळजीही हे सरकार घेत असते.
एकाच घटनेने बदलला सिंगापूरचा दृष्टिकोन : 8 डिसेंबरच्या रात्री 9.20 वाजता 33 वर्षीय भारतीय कामगार सक्तिवेल कुमारावेलू यांचा बसमध्ये चढताना मृत्यू झाला. त्यानंतर दंगल भडकली. संतप्त जमावाने 23 आपत्कालीन आणि अन्य वाहने पेटवून दिली. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पोहोचलेल्या पोलिस दलातील 49 जण जखमी झाले. दोन तासांनंतर परिस्थिती नियंत्रणात आली. त्याच रात्री पोलिसांनी 27 जणांना अटक केली. त्यापैकी 24 जण भारतीय होते. घटनेच्या दुस-याच दिवशी पंतप्रधान ली सिएन लुंग यांनी चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा केली. आतापर्यंत 35 भारतीयांविरुद्ध न्यायालयात चालान दाखल करण्यात आले आहे.