आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबिउद्दीनसह सात दोषी आजन्म तुरुंगात राहणार, दोघांना १४, तर तिघांना ८ वर्षांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळनजीक पकडण्यात आलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड विशेष न्यायालयाने मुख्य सूत्रधार जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदालसह ७ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावली. दोन दोषींना १४ वर्षांचा तुरुंगवास तर तिघांना तब्बल ८ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय सर्वच दोषींना प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया यांच्या हत्येचा कट आणि भारतात मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने जबिउद्दीन ऊर्फ अबू जुंदाल आणि त्याचा सहकाऱ्यांनी सन २००६ मध्ये मराठवाड्यात मोठा शस्त्रसाठा आणला होता. औरंगाबादजवळ वेरूळनजीक (खुलताबाद) ९ मे २००६ रोजी राज्याच्या दहशतवाद-विरोधी पथकाने (एटीएस) धडक कारवाई करत दोन गाड्यांमधून हा शस्त्रसाठा जप्त केला होता. यामुळे राज्यातील भयंकर दहशतवादी हल्ला रोखण्यात यश आले होते. या प्रकरणी मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
न्यायालयाने दिलेल्या या निकालात तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांवर मात्र ताशेरे ओढण्यात आले आहेत. शस्त्रसाठा प्रकरणी अटक केलेल्या आरोपींवर ‘मकोका’ कायद्यानुसार खटला चालवण्याच्या दृष्टीने एटीएस आवश्यक पुरावे मिळवू शकले नव्हते.

मरेपर्यंत जन्मठेप (२० हजार रुपये दंड)
> सय्यद जबिउद्दीन सय्यद जकिउद्दीन उर्फ जबी ऊर्फ रियासत अली उर्फ अबु जुंदाल
> मोहंमद आमिर शकील अहमद ऊर्फ आमिर शेख
> सय्यद अतीफ सय्यद जफरुद्दीन ऊर्फ सय्यद आतीफ
> फैझल अताऊर रेहमान शेख ऊर्फ फैझल शेख
> अफरोझ खान शाहीद खान पठाण ऊर्फ अफरोज खान
> बिलाल अहमद अब्दुल रझाक
> अस्लम कश्मिरी

१४ वर्षे तुरुंगवास (२० हजार रुपये दंड, न भरल्यास १ वर्षे अतिरिक्त तुरुंगवास)
> मोहंमद मुजफ्फर मोहमद तन्वीर
> डॉ. मोहंमद शरीफ शाबीर अहमद

८ वर्षे तुरुंगवास (२० हजार रुपये दंड, न भरल्यास १ वर्षे अतिरिक्त तुरुंगवास)
> मुश्ताक अहमद मोहंमद इसाक शेख ऊर्फ मुश्ताक शेख
> अफझल खान नबी खान { जावेद अहमद ऊर्फ अब्दुल माजिद
औरंगाबाद एटीएसने खोटा ठरवला रियासत
मी पाकिस्तानी नागरिक अाहे. माझे नाव रियासत अली आहे, हा अबु जिंदालचा दावा खोटा सिद्ध करण्यात औरंगाबाद एटीएसच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी वैद्यकीय अधिकारी असल्याची बतावणी करून अबुच्या बीड येथील घरात प्रवेश मिळवला. तुमच्या भागात मलेरियाची साथ पसरल्याने रक्ताचे नमुने गोळा करून तातडीने दुबईला पाठवले. डीएनए टेस्टमध्ये रियासत अली म्हणजेच अबु असल्याचे स्पष्ट झाले.

सामान्यांचा निकाल
एकूण साक्षीदारांपैकी ६५ साक्षीदार स्वत:हून माहिती देण्यासाठी तपास यंत्रणांकडे आले. ते सर्व विविध जाती-धर्माचे होते. त्यामुळे हा गुन्हा उघडकीस अाला. म्हणूनच हा निकाल जनसामान्यांनीच दिला, असे कोर्ट म्हणाले.

दोष सिद्ध झालेले आरोपी :
मुख्य सूत्रधार :
१) मोहम्मद आमीर शकील अहमद उर्फ आमीर शेख
२) सय्यद जबीउद्दीन सय्यद जकीउद्दीन उर्फ जबी उर्फ रियासत अली उर्फ अबु जुंदाल
सहआरोपी :
३) मोहम्मद मुजफ्फर मोहम्मद तन्वीर
४) अफझल खान नबी खान
५) मुश्ताक अहमद मोहम्मद इसाक शेख उर्फ मुश्ताक शेख
६) डॉ. मोहम्मद शरीफ शाबीर अहमद
७) जावेद अहमद उर्फ अब्दुल माजीद
८) बिलाल अहमद अब्दुल रझाक
९) सय्यद अतीफ सय्यद जफरुद्दीन उर्फ सय्यद आतीफ
१०) अस्लम कश्मिरी
११) फैझल अताऊर रेहमान शेख उर्फ फैझल शेख
१२) अफरोझ खान शाहीद खान पठाण उर्फ अफरोज खान

निर्दोष मुक्तता :
१) मोहम्मद जुबेर सय्यद
२) अब्दुल अझीम उर्फ राजा उर्फ अब्दुल अझीज अब्दुल जलील
३) रियाझ अहमद मोहम्मद रमजान उर्फ राजू
४) खातीब इम्रान अकील अहमद
५) शेख विकर अहमद निसार
६) अब्दुल समद उर्फ मोहम्मद समद शमशीर खान
७) मोहम्मद अकील मोहम्मद इस्माईल मोमीन
८) फिरोझ ताजुद्दीन देशमुख

२६/११ हल्ला : बोटीच्या तपासणीची भारताला मुभा
इस्लामाबाद - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात वापरलेल्या ‘अल फौज’ नावाच्या बोटीची तपासणी करण्याची परवानगी पाकच्या कोर्टाने भारतीय तपास संस्थांना दिली आहे. सध्या ही बोट कराचीत असून तिच्यातच बसून १० अतिरेकी आले होते.

झाकीर नाईकच्या उल्लेखाकडे दुर्लक्ष
निर्दोष सुटलेल्या समद शेख आणि फिरोज देशमुख या आरोपींनी पाकिस्तानातील राहिल नावाचा एक फरार आरोपी झाकीर नाईकच्या प्रक्षोभक भाषणांच्या सीडी मागत असल्याची कबुली तपासात दिली होती. मात्र त्याकडे तपास यंत्रणांनी दुर्लक्ष करत त्या दिशेने पुढील तपास केलाच नसल्याचे या निर्णयाने अधोरेखित झाले आहे.

फरार आरोपीची दुसरी स्वतंत्रपणे सुनावणी
जबिउद्दीनअन्सारीच्या देशाविरुद्धच्या कटात सहभागी शेख अब्दुल नईम ऊर्फ नयू ऊर्फ समीर अटकेनंतर पोलिसंच्या कोठडीतून फरार झाला होता. त्याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्याच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे, तर मुस्तफा मुहम्मद सय्यद ऊर्फ मुन्ना मुस्तफाला याप्रकरणी माफीचा साक्षीदार केले.
अजमल कसाबला हिंदी शिकवणारा जबिउद्दीन अन्सारी?

जप्त शस्त्रसाठा
३२०० काडतुसे
५० हँडग्रेनेड
१० एके-४७
३० किलोआरडीएक्स
१० वर्षे : तब्बल दहा वर्षे हा खटला रेंगाळला. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर गुरुवारी खटल्याचा निकाल आला.

जबिउद्दीन अन्सारी हा मूळ बीडच्या हत्तीखाना भागातील रहिवासी असून स्फोटकाने भरलेली इंडिका तो स्वत:च चालवत होता. एटीएसला गुंगारा देऊन पसार होण्यात तो यशस्वी झाला. वेरूळहून तो मालेगावला गेला. तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो बांगलादेशला पळाला आणि नंतर तिथूनच तो पाकिस्तानमध्ये गेला. पाकिस्तानमध्ये लष्कर- ए- तोयबासह मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट त्याने रचला. या हल्ल्यात जिवंत पकडलेला आणि नंतर फासावर चढवलेल्या अजमल कसाबला त्याने हिंदी शिकवली होती. २०१२ मध्ये त्याचे सौदी अरेबियातून भारताला प्रत्यार्पण करण्यात आले.

मे २००६ टाटासुमो इंडिकामधून चांदवड-मनमाडदरम्यान मोठा शस्त्रसाठा नेण्यात येत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. एटीएसने पाठलाग करून वेरूळजवळ हा शस्त्रसाठा जप्त केला.

ऑगस्ट२०१३ विशेषमकोका न्यायालयाने आरोपींविरुद्ध मकोका, अवैध शस्त्रास्त्र, स्फोटके कायदा, अवैध कारवाया प्रतिबंधक कायदा अशा कायद्यांतर्गत आरोप निश्चित.
२००९सुप्रीमकोर्टाने सुनावणीवरील स्थगिती उठवली. एकाने मकोका कलमांच्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान दिल्याने काही काळ सुनावणी स्थगित.
ऑगस्ट२०१५ याखटल्याची सुनावणी वेगाने करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने विशेष मकोका न्यायालयाला दिले.

नेमके काय घडले?
लोकांच्या मनात दहशत आणि नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट जबिउद्दीन अन्सारीसह या प्रकरणातील आरोपींचा लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा आणि नरेंद्र मोदी, प्रवीण तोगडियांसारख्या नेत्यांच्या हत्येचा कट होता, हा सरकार पक्षाचा दावा विशेष मकोका न्यायालयाने मान्य केला.
काय आहे प्रकरण..
9 मे, 2006 ला तत्‍कालिन एटीएस प्रमुख के. पी. रघुवंशी यांना माहिती मिळाली होती की, नाशिक-मनमाडच्‍या मध्‍ये शस्‍त्रसाठ्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. त्‍यानंतर एटीएसचे पथकं आरोपीचा शोध घेण्‍यासाठी विविध भागात रवाना झाली. दरम्‍यान, औरंगाबादजवळ टाटा सुमो व इंडिका या दोन गाड्या पथकाला दिसल्‍या; या गाड्यांचा पाठलाग सुरू असताना, आरोपींनी टाटा सुमो तेथेच सोडून इंडिकामध्‍ये बसून पळ काढला. शस्‍त्र साठ्याची वाहतूक करणा-या दोन गाड्यांपैकी एक गाडी अबू चालवत होता. या प्रकरणात 22 लोकांना अटक करण्‍यात आली होती. पैकी 11 जणांना दोषी ठरवण्‍यात आले.
एका दवाखान्‍यात ठेवला होता शस्‍त्रसाठा..
जप्‍त करण्‍यात आलेल्‍या टाटा सुमोमध्‍ये 16 एके-47 रायफल्स, 3200 काडतूसं, 64 मॅगजीन्स, सुमारे पाच डझन हँडग्रेनेड्स व 43 किलो आरडीएक्स असा शस्‍त्रसाठा होता. पुढे मालेगावमध्‍ये एक इंडिका बेवारस मिळाली होती. नंतर कळाले की, विस्फोटक साहित्‍य मालेगावच्‍या एका डॉक्‍टरच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये लपवण्‍यात आले. जी इंडिका बेवारस दिसली त्‍यामध्‍ये अबूने औरंगाबाद ते मालेगाव असा प्रवास केला होता. तेथून पुढे तो मुंबईत पोहोचला.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, कोण आहे हा मराठवाड्यातील दहशतवादी अबू, पाकमध्‍ये त्‍याने काय केले, मुंबई हल्‍ल्‍यात त्‍याचा काय सहभाग होता व इतर बाबी..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...